राज्यात ‘अपना भांडार’ची जिल्हानिहाय साखळी – शेतकरी ते ग्राहक थेट जोडले जाणार-पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा

मुंबई, – राज्यात शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांना थेट लाभ मिळावा, यासाठी ‘अपना भांडार’च्या माध्यमातून खरेदी-विक्रीची मजबूत साखळी उभारण्याचा संकल्प पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीत त्यांनी ही घोषणा केली.
महासंघाच्या बहुउद्देशीय ग्राहक भांडारांमुळे शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होत असून, ग्राहकांना गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळत आहेत. या उपक्रमाचा विस्तार सर्व जिल्ह्यांमध्ये करण्याची योजना आहे. जिल्हाधिकारी कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या, महिला बचत गटांच्या मॉल्स अशा ठिकाणी ‘अपना भांडार’ सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना यात प्राधान्याने स्थान देण्याची सूचना केली.
रावल यांनी महासंघाच्या जागांचा पुनर्विकास, भाडेतत्वावरील जागांची मालकी मिळविण्याचे प्रयत्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला. याचबरोबर सप्टेंबर महिन्यात नाशिक येथे सर्व ग्राहक भांडारांचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मेळाव्यात इ-कॉमर्स तज्ञ, इतर राज्यांतील यशस्वी संस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
प्रारंभी कार्यकारी संचालक विकास रसाळ यांनी महासंघाच्या कामकाजाची सविस्तर माहिती सादर केली.