कांदा टंचाईचं संकट गडद?
“आज कांदा वाचवा… उद्या कांदा मिळणार नाही!” – पाशा पटेलांचा इशारा शेतकरी संघटनांचा सरकारला थेट अल्टिमेटम
नाशिक | प्रतिनिधी राज्यात येत्या काही महिन्यांत कांद्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी कांद्याच्या घटत्या लागवडीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत इशारा दिला आहे की, आज योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात ग्राहकांनाही कांद्याचा तुटवडा जाणवू शकतो.
सध्या कांद्याला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड कमी केली आहे. यामुळे आगामी हंगामात बाजारात कांद्याची आवक घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, विविध शेतकरी संघटनांनीही सरकारला थेट इशारा दिला आहे. कांदा उत्पादकांना हमीभाव, तातडीची खरेदी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ठोस निर्णय त्वरित जाहीर न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारभाव मात्र घसरले आहेत. त्यामुळे कांदा पिकवणे परवडेनासे झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर पुढील हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. आता राज्य सरकार कांदा उत्पादकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार आणि संभाव्य कांदा टंचाई टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करणार, याकडे शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.