पावसाची साथ, डाळिंबाची भरघोस आवक!
 
मुंबई Apmc घाऊक फळ बाजारात दर घसरले ग्राहकांना मोठा दिलासा
नवी मुंबई : यंदा आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने डाळिंबाचे उत्पादन वाढले असून त्याचा थेट परिणाम मुंबई APMC घाऊक फळबाजारात दिसून येत आहे. बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरात लक्षणीय घसरण झाली असून ग्राहकांना तुलनेने स्वस्त दरात दर्जेदार डाळिंब उपलब्ध होत आहेत.
गेल्या चार वर्षांपासून आखाती देशांसह युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठा भारतीय डाळिंबासाठी खुल्या झाल्याने उच्च दर्जाच्या फळांना मोठी निर्यात मागणी आहे. यंदा पावसाची उत्तम साथ आणि शेतकऱ्यांनी घेतलेली योग्य काळजी यामुळे मोठ्या आकाराचे, टपोऱ्या दाण्यांचे आणि उत्कृष्ट दर्जाचे डाळिंब मोठ्या प्रमाणात उत्पादित झाले आहे.
सध्या सोलापूर, संगमनेर, सांगोला, फलटण, बारामती आणि पंढरपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात डाळिंब मुंबईच्या घाऊक फळबाजारात दाखल होत आहे. यापूर्वी दररोज सरासरी १० गाड्यांची आवक होत होती. मात्र आता ही संख्या तब्बल ४० ते ५० गाड्यांपर्यंत वाढली आहे.
आवक वाढल्यामुळे बाजारातील दरही खाली आले आहेत. काही दिवसांपूर्वी १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे डाळिंब सध्या ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, दुसरीकडे चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला देशांतर्गत आणि निर्यात बाजारातही चांगली मागणी कायम आहे.