NMMC आयुक्त एक्शन मोडवर!
राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC मधील अती धोकादायक कांदा बटाटा मार्केटच्या   पाणी पुरवठा खंडीत
APMC कांदा-बटाटा मार्केटमधील २३ वर्षांपासून बाजार घटक जीव मुठीत धरून करतात व्यवसाय
Apmc प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह!
नवी मुंबई : भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील अतिधोकादायक इमारतींविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने शहरातील ३४ अतिधोकादायक बांधकामांचा वापर तात्काळ बंद करून ती पाडण्याचे आदेश दिले आहेत. याच कारवाईअंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMC मधील अतिधोकादायक कांदा-बटाटा मार्केटचा पाणीपुरवठा सोमवार (३ ऑगस्ट) रोजी खंडित करण्यात आला आहे. तसेच संबंधित इमारतींचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण (MSEB) ला देखील सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
मात्र, ही कारवाई नवीन नसल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही कांदा-बटाटा मार्केटचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला होता.
यामुळे आता पुन्हा करण्यात आलेली कारवाई ही केवळ दिखाव्यासाठी आहे का? असा सवाल बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे. एका बाजूला इमारत अतिधोकादायक असल्याचे प्रशासन सांगते, तर दुसऱ्या बाजूला पुनर्विकासाचा प्रश्न मात्र वर्षानुवर्षे प्रलंबित आहे.
विशेष म्हणजे, कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रकल्प तब्बल २३ वर्षांपासून रखडलेला आहे. APMC प्रशासन आणि व्यापारी यांच्यात आवश्यक समन्वयाचा अभाव असल्याने आजही हजारो व्यापारी, माथाडी कामगार आणि बाजाराशी संबंधित नागरिक जीव मुठीत धरून या धोकादायक इमारतीत व्यवसाय करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे APMC प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ पाणी किंवा वीज तोडण्याऐवजी व्यापारी, माथाडी संघटना आणि बाजारातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन पुनर्विकासाचा ठोस आराखडा तयार करण्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे.