संत्रा भावात उसळी! फक्त २५ टक्के बागांतच फळे, व्यापाऱ्यांमध्ये दर्जेदार संत्र्यांसाठी चढाओढ

 
अमरावती,   राज्यात संत्रा उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम संमिश्र ठरतोय. तापमानातील तीव्र वाढ, अवेळी पावसाचा फटका आणि वातावरणातील अस्थिरता यामुळे संत्रा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, आंबिया बहरातील फळे अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे यंदा चांगल्या प्रतीच्या संत्र्यांना ४५ ते ५० हजार रुपये प्रतिटन दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑगस्ट महिन्यात आंबिया बहरातील संत्र्यांची मुख्य आवक अपेक्षित असून, सुरुवातीपासूनच फळगळ आणि बुरशीजन्य आजारांनी उत्पादकतेवर मर्यादा आणल्याने बाजारात गुणवत्तापूर्ण संत्र्यांना प्रचंड मागणी आहे.
संत्रा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात फुलधारणेनंतर फळांचे सेटिंग होणाऱ्या काळात तापमान ४० अंशांवर गेले. त्यामुळे फळधारणा अपूर्ण राहिली. शिवाय सिट्रससायला या रोगाचा प्रादुर्भाव झाडांच्या टोकांवर झाला, ज्याचा थेट परिणाम संत्र्याच्या फुटीवर आणि फळधारणेवर झाला. परिणामी, अमरावती जिल्ह्यातील फक्त २५ ते ३० टक्के संत्रा बागांमध्येच फळे शिल्लक आहेत.
सध्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथे अमरावती, वरुड, मोर्शी, अचलपूरसह मध्य प्रदेशमधील सौंसर, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि राजस्थानमधून व्यापारी संत्रा खरेदीसाठी दाखल झाले आहेत. उच्च प्रतीच्या बागांसाठी थेट शेतावरच सौदे होत असून व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडक उत्पादकांना चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात संत्रा पीक ८२,३७८ हेक्टरवर
अमरावती जिल्ह्यात एकूण ८२ हजार ३७८ हेक्टरवर संत्र्याचे पीक घेतले जाते. यापैकी सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबिया बहर घेतला जातो. मात्र यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्क्यांहून अधिक बागा फळविहीन झाल्या असून, उर्वरित २५-३० टक्के बागांमधील संत्र्यांना मागणी व भाव दोन्ही मिळण्याची संधी आहे.
भाववाढीची शक्यता कायम
सुरुवातीच्या काळातच संत्रा फळांची बाजारातील आवक कमी राहणार असल्याने मागणी आणि पुरवठ्याच्या असंतुलनामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. दर्जेदार बागांकरिता व्यापाऱ्यांची रिअल टाईम स्पर्धा सुरु असून, अनेक व्यापारी संत्रा सौद्यांसाठी आगाऊ भेटी देत आहेत.