खानदेशात पपई दरात सुधारणा! शेतकऱ्यांना जागेवर दर किलो 16 ते 18 रुपये

एपीएमसी न्यूज़ नेटवर्क :
खानदेशातील नंदुरबार, धुळे आणि परिसरात पपईच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या उत्तरेकडून पपईसाठी मोठी मागणी असल्याने दर प्रतिकिलो १६ ते १८ रुपये इतका मिळत आहे. शेतकऱ्यांना शिवार खरेदीत चांगला भाव मिळत असून यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
सध्या दर्जेदार पपई खानदेशात कमी प्रमाणात उपलब्ध आहे. बाजारात रोज केवळ ८ ते १० ट्रक इतकीच पपईची आवक होत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे गणित शेतकऱ्यांच्या बाजूने गेले आहे. मागणी वाढत असतानाच उत्पादन तुलनेत कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.
याआधी एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांनी पपईच्या दरात मोठी घसरण अनुभवली होती. काही ठिकाणी प्रतिकिलो फक्त १० ते १२ रुपये दर मिळत होता. त्या काळात अनेकांचे पीक संपुष्टात आले आणि आवक देखील कमी झाली होती. त्यामुळे दर टिकून राहिले नाहीत. मात्र आता श्रावणमास आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे फळांना विशेषतः पपईला मागणी वाढली आहे.
डिसेंबर आणि जानेवारीमध्ये पपईला चांगली मागणी होती आणि दरही समाधानकारक होते. त्यानंतर काही काळ दर कोसळले. आता पुन्हा एकदा बाजारात सुधारणा होत असून शेतकरी वर्ग थोडा सकारात्मक झाल्याचे चित्र आहे.
शेतकरी म्हणतात की, सध्या बाजारातील स्थिती पाहता उत्पादनात सातत्य राखल्यास दर आणखी सुधारू शकतात. मात्र चांगल्या दरासाठी दर्जा, वाहतूक सुविधा आणि साठवणुकीचे नियोजन गरजेचे आहे, असेही मत नोंदवले जात आहे.