अवकाळी पावसाचा राज्यातील 21 जिल्ह्यांना फटका, प्राथमिक अहवालातून आली काळजीची बातमी

Unseasonal Rain राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल समोर आली आहे.   अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 21 जिल्ह्यातील शेतीपिकांना फटका बसला आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील   22 हजार 233 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकाचे नुकसान या अवकाळी पावसामुळे झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. 
   
कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक फटका?
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती जिल्ह्याला बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील 10, 636 हेक्टरवरील पिके यामुळे बाधित झाली आहेत. त्याखालोखाल जळगावमध्ये 4,396, नाशिक 1,734, जालना 1,695 तर चंद्रपूरमध्ये 1, 038 हेक्टर वरील पिकांना अवकाळीचा तडाखा बसल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अमरावती,जालना ,जळगांव,चंद्रपूर,पालघर,रायगड,ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, आहिल्यानगर, पुणे, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, वर्धा, गोंदिया नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याची माहिती या अहवालात देण्यात आलीय. 
या पावसामुळे कांदा, आंबा, भात, बाजरी, मका, डाळिंब, संत्री यांसह भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.   19 मे पर्यंत पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग कायम आहेत. 
मराठवाड्यालाही मोठा फटका 
दरम्यान राज्यातील अवकाळी पावसाचा मोठा फटका मराठवाड्यालाही बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, मराठवाडा विभागातील   17 हेक्टर जिरायत क्षेत्र, 1 हजार 480 हेक्टरवरील बागायत आणि 1 हजार 18 हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला. एकूण 2 हजार 511 हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहेत. तसेच 1 मे ते 12 मे दरम्यान वीज पडून 6 जणांचा आणि झाड पडून एकाचा असे सात जणांचा मृत्यू झाला आहे.वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मका पिकासह अन्य उन्हाळी पिकांना फटका बसला. तसेच मोसंबी, आंबा यासह अन्य फळबागा देखील बाधित झाल्या आहेत.