वाहतूकदाराची दादागिरी; APMC फळ मार्केटमध्ये गोंधळ; जावक गेट बंद, अधिकारी–कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव — थेट बाजार फी वसुलीमुळे कोट्यवधींचा फटका!
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) फळ मार्केटमधील जावक गेटवर आज वाहतूकदाराच्या दादागिरीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बाजार प्रवेश शुल्क व योग्य सेस न भरता दररोज १० ते २५ वाहने बाहेर काढणाऱ्या एका वाहतूकदाराने बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची गंभीर घटना घडली.
जावक गेटवर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या थेट बाजार फी वसुलीमुळे काही वाहतूकदारांकडून सातत्याने वाद निर्माण होत आहेत. या अनागोंदीमुळे बाजार समितीला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रशासनाने यापूर्वीही निदर्शनास आणून दिले होते.
आज सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित वाहतूकदाराकडे गेट पास व योग्य सेस पावतीची मागणी केली असता, त्याने थेट कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत शिवीगाळ केली. शासनाच्या कामात अडथळा आणणे व कर्मचाऱ्यांना धमकावणे या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले. यानंतर उपसचिव, सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जावक गेट तात्पुरते बंद करून APMC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजमध्ये वाहतूकदार कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याचे स्पष्ट दिसते. कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित वाहतूकदार दररोज १० ते १५ वाहनांद्वारे शेतमाल बाजाराबाहेर नेत होता. प्रत्येक वाहनामागे किमान १५०० रुपयांहून अधिक सेस अपेक्षित असताना, तो केवळ ४० ते ५० रुपये भरून दादागिरीच्या जोरावर वाहने बाहेर काढत होता.
आज कर्मचाऱ्यांनी ‘प्रॉपर सेस पावती आणल्याशिवाय वाहन सोडले जाणार नाही’ अशी ठाम भूमिका घेतल्याने वाद अधिक चिघळला. परिणामी जावक गेट बंद ठेवण्यात आल्याने शेतमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा बाजार आवारात लागल्या.
सदर वाहतूकदार व बाजार समितीचे अधिकारी–कर्मचारी सध्या APMC पोलीस ठाण्यात उपस्थित असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रायोगिक थेट बाजार फी वसुली बंद करून भाजीपाला व कांदा मार्केटप्रमाणे निश्चित व पारदर्शक आकारणी पद्धत लागू करावी, अशी जोरदार मागणी बाजारातील घटकांकडून होत आहे.