मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये ‘इंडियन रॉयल गाला’ची धूम! गोडसर चव आणि परवडणाऱ्या किमतींनी ग्राहकांना भुरळ

मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये ‘इंडियन रॉयल गाला’ची धूम! गोडसर चव आणि परवडणाऱ्या किमतींनी ग्राहकांना भुरळ
नवी मुंबई ,एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : मुंबई APMC होलसेल फळ मार्केटमध्ये सध्या हिमाचल प्रदेशातील सफरचंदांची मोठी आवक सुरू झाली आहे. त्यात विशेषतः काश्मीर आणि शिमल्यातील ‘इंडियन रॉयल गाला’ सफरचंद ग्राहकांच्या पहिल्या पसंतीस उतरले आहे. गोडसर चव, रसाळपणा, आकर्षक लालसर-गुलाबी रंग आणि तुलनेने कमी किंमत यामुळे या सफरचंदांना मोठी मागणी मिळत आहे.
सध्या ‘इंडियन रॉयल गाला’चा दर किलोमागे 90 ते 150 रुपये असून, दररोज चार   ते पांच गाड्या या सफरचंदांची आवक होते आहे. बाजारात वॉशिंग्टन, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, टर्की आणि इटली येथील प्रसिद्ध ‘रॉयल गाला’ तसेच इतर आयातीत सफरचंदांचीही विक्री सुरू आहे. विदेशी रॉयल गालाला समसमान आकार, सौम्य गोडसर-आंबटसर चव आणि दीर्घ शीतगृह साठवण क्षमता असल्याने गिफ्ट पॅकिंग व उच्चभ्रू बाजारपेठेत मागणी असली, तरी 150   ते 300 रुपये किलो दरामुळे तो दैनंदिन खरेदीसाठी तुलनेने कमी लोकप्रिय आहे.
याउलट, देशी ‘इंडियन रॉयल गाला’ स्वस्त, ताजे आणि रसाळ असल्यामुळे दैनंदिन वापर व सणासुदीच्या खरेदीसाठी जास्त पसंत केला जातो. सध्या हिमाचल प्रदेशातून दररोज 50 ते 70 गाड्या सफरचंदांची आवक होत असून, दरही आटोक्यात आले आहेत.
व्यापारी विजय बेंडे सांगतात, “गणेशोत्सव आणि पुढील सणासुदीच्या काळात देशी रॉयल गालाला मागणी वाढेल. हंगाम आणखी दोन महिने सुरू राहणार असून, आवक वाढल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.”