APMC NEWS IMPACT | मुंबई APMC मध्ये ‘24x7 आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ सुरू; शशिकांत शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर तातडीची कारवाई

नवी मुंबई : सततच्या अतिवृष्टीमुळे मुंबई APMC मार्केट पाण्यात बुडालं होतं. व्यापारी, माथाडी कामगार आणि वाहनचालक यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असताना APMC प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याच्या तक्रारी होत होत्या.
सभापती, उपसभापती आणि मार्केट संचालक यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. व्यापारी व माथाडी कामगारांनी साचलेल्या पाण्याची माहिती कामगार प्रतिनिधी व आमदार शशिकांत शिंदे यांना दिल्यानंतर, त्यांनी आपली महत्वाची कामे बाजूला ठेवून तातडीने मार्केटमध्ये धाव घेतली.
दरम्यान, संचालक मंडळाची बैठक संपूनसुद्धा उपसभापती आणि काही संचालक गेस्ट हाऊस मध्ये तळ ठोकून बसले होते, मात्र परिस्थितीची माहिती असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा बाजार परिसरात रंगली आहे.
आमदार शिंदे यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत “आत्तापर्यंत आपत्ती व्यवस्थापन कक्ष का उभारला नाही?” असा सवाल केला. त्यानंतर बाजार समितीने २४x७ आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला असून अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांची दिवस-रात्र ड्युटी लावण्यात आली आहे.
धोकादायक इमारती, गाळे व इतर अडचणींचा तातडीने आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. APMC च्या मुख्यालयात सुरु करण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षाशी व्यापारी, माथाडी कामगार आणि वाहनचालक यांनी कोणतीही अडचण आल्यास त्वरित 022-27888925 / 022-27888414 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.