मुंबई APMC प्रशासक नियुक्तीवर विकास रसाळ यांचा खुलासा : “माझी नियुक्ती कायदेशीर आहे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर पणन संचालक विकास रसाळ यांनी प्रशासक पदाची धुरा स्वीकारली. या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
रोहित पवार यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “एखादा अधिकारी स्वतःच प्रशासक म्हणून नेमणूक करू शकतो का? मुंबई APMC ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ बनत आहे. येथे हजारो कोटींचा निधी येणार आहे. या नियुक्तीमागे निधीतून हिस्सा घेण्याचा डाव तर नाही ना?”
दरम्यान, पणन संचालक व सध्याचे प्रशासक विकास रसाळ यांनी या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “माझी नियुक्ती पूर्णपणे कायदेशीर असून पणन कायद्यातील तरतुदीनुसारच झाली आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर तात्पुरत्या व्यवस्थेसाठी प्रशासक नेमण्याची जबाबदारी कलम १६ (अ) नुसार पणन संचालकावरच असते. मुंबई बाजार समितीचे व्यवहार व्यापक आहेत. येथे सचिव पद हे अपर निबंधक सहकारी संस्था या संवर्गातील आहे. त्यावर वरीष्ठ अधिकारी म्हणून पणन संचालक हा पणन विभागातील एकमेव अधिकारी आहे. त्यामुळेच माझी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही नियुक्ती पूर्णपणे योग्य आणि वैध आहे.”