मुंबई APMC सचिव जरे यांची ‘स्वच्छ मार्केट’ मोहीम वेगात; सर्व विभाग प्रमुखांना 24 तासांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश!
-बाजार आवारातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन आणि प्रसाधनगृहे–गटारे यांच्या देखभाली संबंधी प्रत्येक विभाग दखल घ्या
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शरद जरे यांनी बाजार आवारातील वाढत्या अस्वच्छतेच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सर्व विभाग प्रमुखांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन आणि प्रसाधनगृहे–गटारे यांच्या देखभालीसंबंधी प्रत्येक विभागाने पुढील २४ तासांत सविस्तर कृती आराखडा सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जरे यांनी दिलेल्या प्रमुख सूचना
१) कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाट – बाजारनिहाय योजना सादर करावी
• विविध बाजार आवारात दैनंदिन कचरा साचत असल्याची तक्रार वाढत आहे.
• मुंबई APMC कडून महानगरपालिकेच्या क्षेपणभूमीवर कचरा टाकला जात असला तरीही बाजारात कचरा साठून राहतो.
• प्रत्येक मार्केटने कचरा वर्गीकरण करून ‘क्लिनिंग यार्ड’ निश्चित करावे व तेथे कचरा संकलित करून महानगरपालिकेकडे योग्य विल्हेवाटीस पाठवावा.
• संबंधित विभाग: उपसचिव (घनकचरा व्यवस्थापन), उपसचिव/उपअभियंता (सर्व मार्केट).
२) प्रसाधनगृह व गटारे – नियमित व प्रभावी साफसफाईचे आदेश
• बाजारातील सर्व टॉयलेट्स आणि गटारांची दैनंदिन व प्रभावी साफसफाई करावी.
• पावसाळा व पावसाळ्यानंतर गटारे प्रवाहीत व सुस्थितीत राहतील याची खात्री करावी.
• संबंधित विभाग: घनकचरा व्यवस्थापन, सर्व मार्केट उपअभियंता.
३) सर्व्हिस रोड व बाजारातील अतिक्रमणाविरुद्ध संयुक्त कारवाई
• सर्व्हिस रोड व अंतर्गत मार्गांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक व स्वच्छतेवर परिणाम होत आहे.
• अतिक्रमण पथकाने नवी मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधून तात्काळ कारवाई करावी.
• संबंधित विभाग: अतिक्रमण पथक प्रमुख, सुरक्षा विभाग, घनकचरा व्यवस्थापन, उपअभियंता (मार्केट).
४) मालमत्ता कर आणि सर्व्हेक्षणाबाबत आवश्यक कारवाई
• नवी मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधून मालमत्ता करासंबंधीची सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत.
• बाजार आवारातील सर्व मालमत्तांचे पूर्ण सर्व्हेक्षण करावे.
• संबंधित विभाग: उपसचिव (मालमत्ता विभाग).
५) सिडको व महानगरपालिकेतील प्रलंबित प्रकरणांची माहिती त्वरित सादर करावी
• विविध विभागांकडे सिडको व महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.
• उपअभियंत्यांनी संबंधित सर्व प्रकरणांची अद्ययावत माहिती सचिव जरे यांना सादर करावी.
APMC मध्ये ‘स्वच्छता मोहिमे’ला गती
सचिव जरे यांच्या निर्देशांनंतर APMC मध्ये सर्व विभाग अचानक सक्रिय झाले असून, कचरा व्यवस्थापनापासून अतिक्रमण कारवाईपर्यंत सर्व कामांमध्ये स्पष्टता आणि गती येण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत या सूचनांचा प्रत्यक्ष परिणाम बाजार आवारात दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.