मुंबई APMC मध्ये माथाडींचा एल्गार! १५ दिवसांचा अल्टिमेटम; मागण्या मान्य नाहीत तर पाचही मार्केटला कुलूप-शशिकांत शिंदेंचा इशारा
एपीएमसी न्यूज नेटवर्क: नवी मुंबई | राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMC मध्ये पुन्हा एकदा कामगारांचा संताप उसळला आहे. मुंबई Apmc सचिवांनी २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या सेवेतून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ३० जुलाई रोजी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुरक्षा कर्मचारी, माथाडी व मापाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. APMC प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता सेवेतून कमी केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मापाडी कामगारांची सुमारे ७ कोटी रुपयांची लेवी थकबाकी तातडीने वसूल करून कामगारांचे पगार द्यावेत, सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेनंतर माथाडी कामगारांच्या मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. या सर्व मागण्या १५ दिवसांत मान्य न झाल्यास आमरण उपोषण, सर्व सभासदांची बैठक आणि गरज पडल्यास मुंबई APMCच्या पाचही मार्केटला कुलूप लावण्याचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.
निवेदनातील प्रमुख मुद्दे
* माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०२६ अखेर APMC मधील मंजूर ८२८ पदांपैकी केवळ ३२५ पदे भरलेली असून तब्बल ५०३ पदे रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
* २०२१ ते २०२६ या कालावधीत निवृत्ती, मृत्यू आणि राजीनाम्यांमुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त झाली असून, पुढील पाच वर्षांत आणखी सुमारे १०० कर्मचारी निवृत्त होणार असल्याने मनुष्यबळाची कमतरता अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
* रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असून बाजार समितीच्या महसूल वसुली, प्रशासन आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
* फळ, भाजीपाला आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये कार्यरत मापाडी कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या रिक्त पदांवर सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. हे कर्मचारी केवळ तोलाई किंवा लोडिंगचे काम करत नसून, बाजार शुल्क (सेस) वसुली, मालाच्या आवक-जावकीची नोंद, गेट तपासणी, महसूल संरक्षण आणि बाजार व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
* फळ मार्केटमधील गेट ड्युटी तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अनुभवी मापाडी कर्मचाऱ्यांकडून गेटवरील तपासणी केल्यास महसूल गळती रोखण्यास आणि बाजारातील शिस्त राखण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.
* याशिवाय सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा घेऊन पात्र माथाडी कामगारांच्या मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
शशिकांत शिंदे यांचा इशारा
शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती, ७ कोटी रुपयांची लेवी थकबाकी वसुली, मापाडी कर्मचाऱ्यांचा समावेश आणि भरती प्रक्रियेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य या सर्व मागण्या १५ दिवसांत मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच सर्व सभासदांची तातडीची बैठक बोलावून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. गरज पडल्यास मुंबई APMC मधील पाचही प्रमुख मार्केटला कुलूप लावण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.