राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC मसाला मार्केटच्या K विंगमध्ये घाणीचे साम्राज्य! अनधिकृत बदाम कारखान्याचा व्यापाऱ्यांना फटका?
-कोट्यवधींचा सेस भरतो, सुविधा कुठे? मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये दुर्गंधीचा विळखा!
-K विंगमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य! १० दिवस तक्रारी करूनही अभियंता विभागाचे दुर्लक्ष?
-बदाम कारखान्यातील कचरा ड्रेनेजमध्ये? APMC मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा संताप!
-गाळ्यासमोर उभे राहणेही कठीण! मसाला मार्केटच्या अभियंता सुट्टीवर तर काम कोण करणार.
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्वचे बाजार मुंबई APMC मसाला मार्केटमधील K विंगमध्ये अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनधिकृत बदाम प्रक्रिया कारखान्यातून निघणारा कचरा ड्रेनेज लाइनमध्ये टाकला जात असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून परिसरात दुर्गंधी आणि किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे व्यापारी, ग्राहक आणि माथाडी कामगारांना घाण पाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे.
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, गाळ्यांसमोर उभे राहणेही कठीण झाले असून तेथे जेवण करणे तर दूरच, अशी व्यथा व्यापाऱ्यांनी मांडली आहे. गेल्या ८ ते १० दिवसांपासून या समस्येबाबत अभियंता विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, सुमारे ८ ते १० व्यापारी आपली तक्रार घेऊन अभियंत्यांकडे गेले असता संबंधित अभियंता सुटीवर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बाजारपेठ सुरू असताना अत्यावश्यक सुविधांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार अधिकारी उपलब्ध नसतील, तर व्यापाऱ्यांच्या समस्या कोण सोडवणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
अनधिकृत बदाम कारखान्यातून निघणारा कचरा आणि टाकाऊ पदार्थ ड्रेनेजमध्ये टाकले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
आम्ही बाजार समितीला कोट्यवधी रुपयांचा सेस भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधा तरी मिळणार की नाही? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी पणन मंत्री व सचिवांकडे उपस्थित केला आहे.
आता तरी APMC प्रशासन आणि अभियांत्रिकी विभाग या समस्येची गंभीर दखल घेऊन ड्रेनेजची स्वच्छता करणार का? अनधिकृत बदाम कारखान्याची चौकशी करून कारवाई होणार का? की व्यापाऱ्यांना अशाच अस्वच्छ वातावरणात व्यवसाय करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.