नवी मुंबइत गुगल मॅपनं थेट खाडीत पाठवलं! बेलापूरमध्ये भीषण घटना – NRI सागरी पोलिसांनी महिलेला दिलं नवजीवन
.jpeg)
नवी मुंबइत गुगल मॅपनं थेट खाडीत पाठवलं! बेलापूरमध्ये भीषण घटना – NRI सागरी पोलिसांनी महिलेला दिलं नवजीवन
नवी मुंबई ,एपीएमसी न्यूज नेटवर्क :
गुगल मॅपवर डोळेझाकून विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं, याचा प्रत्यय नवी मुंबईतील बेलापूरमध्ये शुक्रवारी पहाटे पाहायला मिळाला. उलवेच्या दिशेने जात असलेल्या एका महिलेला गूगल मॅपनं असा मार्ग दाखवला, की तिची कार थेट समुद्राच्या खाडीत कोसळली.
सुदैवाने NRI सागरी पोलिसांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला.
ही घटना शुक्रवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. महिला कारने उलवेच्या दिशेने जात होती. बेलापूर खाडी पुलावरून जाण्याऐवजी, गूगल मॅपवर दाखवलेल्या मार्गावर ती पुलाखालून गेली. मात्र तो मार्ग प्रत्यक्षात खाडीत संपतो, हे तिच्या लक्षात येण्याआधीच कार थेट ध्रुवतारा जेट्टीत कोसळली.
तेवढ्यात जवळ गस्त घालत असलेल्या NRI सागरी सुरक्षा पोलिसांनी त्वरित कारवाई करत बचाव नौका पाठवली आणि डुंबत असलेल्या महिलेला बाहेर काढलं. नंतर क्रेनच्या मदतीने कारही बाहेर काढण्यात आली.
या अपघातामागे फक्त गूगल मॅपचा दिशाभूल करणारा मार्गच जबाबदार नाही, तर एक गंभीर निष्काळजीपणाही समोर आला आहे.
घटनास्थळी रस्त्याचं काम सुरू होतं, आणि जिथे रस्ता संपतो तिथे कोणतीही सुरक्षाभिंत, अडथळा किंवा चेतावणी फलक लावण्यात आलेला नव्हता.
या धोकादायक व्यवस्थापनामुळेच महिला थेट खाडीत कोसळली. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गुगल मॅप वापर करताना अति अवलंबित्व धोकादायक ठरू शकते. आणि प्रशासनाकडून देखील अपूर्ण रस्त्यांवर योग्य सुरक्षा उपाययोजना असणे अत्यावश्यक आहे.
#GoogleMapAccident #BelapurKhadiprashna #NaviMumbaiNews #NRISeaPolice #सुरक्षा_कुठे #ब्रेकिंगन्यूज