नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन — महाराष्ट्रात तब्बल ₹19,200 कोटींची गुंतवणूक, 60 हजार रोजगारांच्या संधी!

नवी मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईतील ऐरोली येथे अत्याधुनिक कॅपिटालँड डेटा सेंटर चे भव्य उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात महाराष्ट्रात डेटा सेंटर, औद्योगिक व बिझनेस पार्क्स उभारण्यासाठी तब्बल ₹19,200 कोटींची गुंतवणूक होणार असल्याची घोषणा झाली असून, त्यामुळे 60 हजार थेट रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नागपूरमध्ये “मेडिसिटी” आरोग्य प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले. मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांच्या सहकार्याने 350 खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र उभारले जाणार असून, यासाठी ₹700 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे 3 हजार रोजगार निर्माण होतील.
फडणवीस म्हणाले, “देशाची 60% डेटा सेंटर क्षमता एकट्या महाराष्ट्रात आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज हे केंद्र डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देईल.” तसेच, मुंबई-पुण्यात बिझनेस पार्क्स, डेटा सेंटर्स आणि राज्यभर लॉजिस्टिक्स व औद्योगिक पार्क्स उभारले जाणार आहेत.
सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांनी भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने वाढणाऱ्या क्षमतेवर भर देत म्हटले, “2030 पर्यंत देशाची डेटा सेंटर क्षमता 1.2 गिगावॅटवरून 4.5 गिगावॅटपर्यंत वाढेल.”
कॅपिटालँड इंडियाचे सीईओ संजीव दासगुप्ता यांनी महाराष्ट्राला कॅपिटालँडसाठी महत्त्वाचा बाजार म्हणून संबोधत राज्याच्या औद्योगिक विकासात सातत्याने योगदान देण्याची ग्वाही दिली.