नवी मुंबईत ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश ; 2 पोलीस हवालदार,1 कस्टम अधिकारी अन् आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट, असा लागला छडा

-पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा सह जवळपास 74 लाखांची मुद्देमाल जप्त केला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट दोन पोलिस, एक कस्टम अधिकारी, दोन आंगडिया एजंटसह एकूण १० जणांनी चालवते होते या सर्व अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या माध्यमातून थायलंड आणि इतर परदेशातून मादक पदार्थ मुंबई व परिसरात पुरवले जात होते. या रॅकेटचे सूत्रधार नवीन चिचकर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सध्या परदेशात स्थायिक असून तिथूनच हा सारा कारभार नियंत्रित करतो. ड्रग्सची तस्करी एअर कार्गोच्या माध्यमातून केली जात होती. यामध्ये कस्टम विभागातील अधिकारी आणि स्थानिक गुन्हेगारी गट सहभागी होते. कस्टम सुपरिटेंडंट एयर कार्गो मधे आलेल्या अमली पदार्थ बाहेर काढण्याचे काम करत होते, तर आंगडिया संस्थेमार्फत विदेशातील ड्रग माफियांना पैसे पोहोचवले जात होते.या प्रकरणाचा उलगडा एनआरआय पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येनंतर झाला. तपासात समोर आले की गुरुनाथ यांचा मुलगा नवीन चिचकर हा मोठा ड्रग माफिया असून, त्याने तरुणांना आकर्षित करून त्यांना आपल्या सिंडिकेटमध्ये सामील केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपी मधे पोलीस कॉन्स्टेबल सचिन भालेराव (खारघर पोलीस ठाणे) व संजय फुलकर (अंमली पदार्थ विरोधी पथक) यांचा समावेश आहे. तसेच कस्टम सुपरिटेंडंट प्रशांत विनोद गौर, आंगडिया एजंट्स अंकित पीतांबर पटेल आणि रिकुंदकुमार दिनेशभाई पटेल यांनाही अटक करण्यात आली आहे.याशिवाय, कमल जयकिशन चांदवाणी उर्फ के .के याला देखील अटक करण्यात आली आहे. त्याने नवीन झा या बनावट नावाने फर्जी आधार कार्ड वापरून ड्रग्स आयात व वितरणाचे काम केले होते.
नवी मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याचा त्यांनी आरोप केला होता. या आरोपांची गंभीर दखल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी विशेष तपास पथक (SIT) ही स्थापन केले. त्यांना या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण याचा तपास करताना त्याची पाळंमुळे एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटपर्यंत जातील असं कुणालाही वाटलं नसेल. विशेष तपास पथकाला तपासादरम्यान काही गोष्टी समोर आल्या. हे रॅकेट थायलंडसह परदेशातून हायड्रो गांजा भारतात आयात करत होते. त्यानंतर तो मुंबई आणि नवी मुंबईत आणला जायचा. त्याचा साठा ही नवी मुंबईत केला जात होता. तिथूनच तो गांडा संपूर्ण देशात वितरित केला जात होता. पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा जप्त केला आहे. शिवाय या प्रकरणात एकूण जप्त मालमत्ता ही जवळपास 74 लाखांची आहे.
या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, खारघर पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन भालेराव याचा गुरुनाथ चिचकर आणि त्याच्या मुलगा नवीन चिचकर यांच्याशी सातत्याने संपर्क होता. तपासाची कल्पना लागताच तो मूळ गावी पळून गेला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तिथून अटक केली. या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन भालेराव, पोलीस हवालदार संजय फुलकर आणि कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांना अटक केली आहे. अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.
नेरूळला गांज्याची विक्री होत आहे, नवी मुंबई पोलिसांना समजले होते. तिथे तिघे जण होते. त्या पैकी एक जण फरार झाला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बरीच माहिती समोर आली. हे ड्रग्ड अमेरिका किंवा थायलंड वरून मागवले जात होते. ते एअरपोर्टवर आल्यानंतर तिथे कस्टमचा माणूस ते क्लिअर करत असे. नंतर त्याचा ताबा एजंटला दिला जात असे. पुढे ते ड्रग्ज पैसे देणाऱ्या माफियांना दिले जात. नंतर त्याचे वितरण देशात वेगवेगळी लोकं करत होती हे या चौकशीत समोर आले आहे.
गुन्हे शाखेचे पुलिस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले की “संपूर्ण सिंडिकेटचे जाळे फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच आणखी अटकेच्या शक्यता आहेत.”नवी मुंबईत सध्या पोलिसांनी ड्रग्स विरोधी मोहिमेला गती दिली असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज सिंडिकेटमध्ये पोलिस व कस्टम अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झाल्याने नवी मुंबई शहरात मोठी खळबळ उडाली आहे.