राज्यातील सर्व गावांत ‘फार्मर कप’; 15 हजार शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याचा संकल्प

मुंबई : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून २०२६-२७ पर्यंत १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून लाखो शेतकऱ्यांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या उपक्रमासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, संस्थापिका किरण राव, एटीई चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग आदींचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना सामूहिक शेती व शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) स्वीकारता याव्यात, उत्पादन व उत्पन्न वाढावे तसेच नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार व्हावा यासाठी ही समिती कार्ययोजना तयार करणार आहे. प्रत्येक गावात ‘फार्मर कप’चा विस्तार करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी स्पष्ट केले.
“गटशेतीमुळे प्रति एकर लागवड खर्चात २० टक्के बचत होईल आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात १०० टक्क्यांपर्यंत वाढ होईल,” असा विश्वास पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या संघटित ताकदीतून ग्रामीण विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ‘फार्मर कप’ पुढील काळात महाराष्ट्रात एक मोठी लोकचळवळ ठरण्याची शक्यता आहे.