जीएसटी दर तर्कसंगत करण्याची मागणी – दि पूना मर्चंट्स चेंबरचे केंद्र-राज्य सरकारला निवेदन

पुणे, एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
सामान्य माणसाच्या हितासाठी आवश्यक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करून कर रचना सुलभ करण्याची मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरने केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनंतर चेंबरने केंद्रिय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारमण आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री मा. अजितदादा पवार यांना निवेदन पाठविले आहे.
चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा भार कमी झाल्यास सामान्य माणसाला दिलासा मिळेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
चेंबरच्या प्रमुख मागण्या :
• अन्नधान्य, डाळी, कृषी उत्पादने, खाद्यतेल, साखर, मसाले यावरील जीएसटी दर कमी करावा.
• सुकामेवा व इतर अन्नपदार्थांवरील जीएसटी १२% वरून ५% करावा.
• कर स्लॅबची संख्या कमी करून जीएसटी रचना सरळ व सोपी करावी.
• लहान व्यवसायांसाठी जीएसटी नोंदणीची मर्यादा वाढवावी.
• सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर सवलतींचा लाभ द्यावा.
• मंडी कर व व्यवसाय करासारखे स्थानिक कर रद्द करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी.
चेंबरच्या मते, या उपाययोजनांमुळे सामान्य माणसाच्या खिशावरचा ताण कमी होईल, व्यवसायासाठी सोयीसुविधा वाढतील आणि करचोरी कमी होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल.