नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी : मोरबे धरण शंभर टक्के भरले

नवी मुंबई – सलग सहा दिवसांच्या संततधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो सुरू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या जलसंपदेत मोठी भर पडली आहे.
बुधवार, दि. 20 ऑगस्ट रोजी पहाटे 3.10 वाजता धरणाचे 12 मी. × 3 मी. आकाराचे दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सें.मी. ने उघडण्यात आले. त्यामुळे 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात करण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील पाणी वाढणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
दररोज ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचे मोरबे धरण आता पूर्ण क्षमतेने (८८ मी.) भरले असून नवी मुंबईला पाण्याची कमतरता जाणवणार नाही, अशी समाधानकारक माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. त्यांनी या जलसमृद्धीबद्दल सर्व नवी मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.