५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्यावर महाविकास आघाडीचे रणशिंग — रोहित पवारांच्या उपस्थितीत बुधवारी बेलापूरला सिडकोवर धडक!

नवी मुंबई – तब्बल ५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडी रणांगणात उतरली आहे. आमदार रोहित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत, बुधवारी (ता. २० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता बेलापूर येथील सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे.
या लढ्यात स्थानिक भूमिपुत्र मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून, बेलापूर परिसर “जमीन घोटाळा बंद करा, हक्क द्या न्याय द्या” या घोषणांनी दणाणून जाण्याची शक्यता आहे.
पवार यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, नवी मुंबईतील १५ एकर मौल्यवान जमीन, जी प्रत्यक्षात सिडकोच्या सामाजिक दायित्वासाठी व आगरी समाजासारख्या वंचित घटकांसाठी राखीव होती, ती सिडको अध्यक्ष शिरसाठ यांनी इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाच्या वारसांच्या ताब्यात दिली. या जमिनीची बाजारभाव किंमत तब्बल ५ हजार कोटी रुपये असून, राजकीय स्वार्थासाठी गरीबांचा हक्क हिरावल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
पवार म्हणाले, “हा मोर्चा केवळ जमीन वाचविण्याचा नाही, तर न्याय व हक्कासाठीच्या निर्णायक संघर्षाची सुरुवात आहे. अन्यायाविरुद्ध स्थानिक नागरिकांनी आवाज बुलंद करावा.”
सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेचा मूळ हेतू वंचितांना न्याय देणे हा असतानाच, राजकीय सौद्यातून घडवलेला हा व्यवहार म्हणजे जनतेचा विश्वासघात असल्याचा ठपका आघाडीने ठेवला. त्यामुळे बुधवारीचा मोर्चा हा नवी मुंबईच्या रणांगणात फुंकलेले रणशिंग ठरणार आहे.