राष्ट्रीय दर्जा मिळण्याआधीच बाजार समित्यांतील कोट्यवधींचे गैरव्यवहार रोखा – राजू शेट्टींचा इशारा!

पुणे : राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, नागपूर आणि नाशिक या सहा प्रमुख बाजार समित्यांना लवकरच राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. मंत्रिमंडळाने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला असून अधिसूचना कोणत्याही क्षणी निघू शकते. परंतु राष्ट्रीय दर्जा मिळण्याआधीच संचालक मंडळांनी आर्थिक लालसेपोटी मालमत्ता विक्री, निविदा प्रक्रियेत अनियमितता आणि कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस येत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
शेट्टी यांनी पणन संचालकांना पत्र देत या सर्व व्यवहारांवर तातडीने बंधने आणावीत आणि चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
मुंबई समितीचा १५० कोटींचा गाळे व काँक्रिटीकरण घोटाळा!
मुंबई बाजार समितीतील गैरव्यवहार सर्वाधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे.
• सुमारे २०० गाळ्यांच्या विक्रीत तब्बल १५० कोटी रुपयांचा गोंधळ
• रस्ते काँक्रिटीकरणाच्या ४० कोटींच्या निविदेत ३ कोटी कमिशन संचालकांनी उकळल्याचा आरोप
या प्रकरणी पणन संचालक विकास रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले असून कंत्राटदार कमिशनसाठी दिलेले पैसे परत कसे वसूल करायचे, यामुळे हवालदिल झाल्याचे बाजारात चर्चेत आहे.
पुण्यात निविदांची लगीनघाई – वसुली टार्गेट!
पुणे बाजार समितीमध्ये सध्या निविदांची लगीनघाई सुरू असून काही विभागप्रमुखांना थेट वसुलीचे टार्गेट दिल्याची चर्चा आहे. “आम्ही एवढी रक्कम गोळा करून देऊ” असा आत्मविश्वास काही प्रमुखांनी संचालकांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
गेस्ट हाऊस बनले ‘वसुली अड्डे’
मुंबई बाजार समितीतील गाळेविक्रीतून किमान १३ कोटी रुपये संचालकांच्या खिशात गेल्याचा आरोप असून, गेस्ट हाऊस हेच वसुली व व्यवहाराचे ठिकाण झाले आहे.
पावसात बाजार बंद, पण संचालक मौजेत!
मुंबईत दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे वाशी बाजार समिती पाण्यात बुडाली. हजारो कोटींचा व्यापार ठप्प झाला, शेतकऱ्यांचे फळे-भाज्या खराब झाल्या, परंतु काही संचालक मात्र गेस्ट हाऊसवर पार्टी आणि मौजमजा करत असल्याचा आरोप बाजार घटकांनी केला आहे.