मराठीत लग्नाचं आमंत्रण दिलं म्हणून विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने हल्ला, वाशी कॉलेजमधील घटनेमुळे खळबळ!

-मराठीत लग्नाचं आमंत्रण दिलं म्हणून हॉकीने हल्ला कॉलेजबाहेर घडलेली घटना
-मनसे नेत्यानं घेतली पोलिस ठाण्यात भेट सोशल मीडियावर भाषावादाचा दुष्परिणाम?
-राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे तरुणांमध्ये द्वेषाचं विष?
नवी मुंबई | एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : नवी मुंबईच्या वाशीतील ICLES मोतीलाल झुंझुनवाला कॉलेजमधील २० वर्षीय बीएस्सी-आयटीचा विद्यार्थी सूरज पवार याच्यावर फक्त मराठीत लग्नाचं आमंत्रण दिलं म्हणून वर्गमित्र फैजान नाईक आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांनी हॉकी स्टिकने हल्ला केला. या प्रकारानंतर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवादाची सुरुवात WhatsApp ग्रुपवरून झाली. सूरज पवारने आपल्या कुटुंबातील लग्नाचं आमंत्रण मराठीत दिलं होतं. पण फैजान नाईकने त्यावर आक्षेप घेत वादाला सुरुवात केली. काही तासांतच वाद प्रत्यक्षात विकोपाला गेला आणि कॉलेजबाहेर पवारवर हल्ला झाला.हल्ल्यानंतर पवारने वाशी पोलिस ठाण्यात नाईक आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक झाली नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहरप्रमुख गजानन काळे यांनी वाशी पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यांनी सांगितलं, “मराठीत आमंत्रण देणं ही काही भांडणाची गोष्ट नव्हे. पण हलक्याशा कारणावरून कॉलेजच्या मुलांमध्ये अशी गंभीर हिंसक घटना घडली, हे चिंताजनक आहे. निशिकांत दुबे आणि अबू आझमीसारख्या नेत्यांचे कट्टर वक्तव्य याला कारणीभूत असू शकतात.” काळे पुढे म्हणाले, “दोनही बाजूचे विद्यार्थी असल्याने आम्ही पोलिसांना सुचवलं आहे की, हे प्रकरण सामोपचाराने मिटवावं. विद्यार्थ्यांनी असं भांडणं नको.”आणि यापुढे पोलिसांनी प्रत्येक कॉलेज आणि शाळात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधला पाहिजे.
वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितलं की, “दोन्ही बाजूचे विद्यार्थी प्रौढ (१८ वर्षांवरील) असल्याने कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल.”पोलिसांनुसार, “केवळ हलक्याशा टोमण्यातून सुरू झालेला हा वाद प्रत्यक्ष हिंसेपर्यंत पोहोचला.”
भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली:
शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितलं की, “अलीकडे मनसे कार्यकर्त्यांकडून दुकानदार, बँक कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना ‘मराठी न बोलल्याबद्दल’ चापट मारण्याच्या व्हायरल व्हिडीओंमुळे समाजात तणावाचं वातावरण आहे. त्याचाच परिणाम आता कॉलेज विद्यार्थ्यांमध्येही दिसू लागला आहे.”