41 अनधिकृत बांधकाम घोटाळा! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीची धडक अटक – वसई-विरार हादरले, राजकीय वर्तुळात खळबळ

एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: वसई-विरार शहरात ४१ अनधिकृत बांधकाम घोटाळ्याच्या तपासात प्रचंड खळबळ माजली आहे. या प्रकरणात बुधवारी संध्याकाळी ईडीने महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी, बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांना अटक केली. या कारवाईने शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले असून अन्य अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२९ जुलै रोजी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी ईडीने छापे टाकून १ कोटी ३३ लाख रुपये आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. तपासात पवार व रेड्डी यांनी बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रती चौरस फुट २०-२५ रुपये आणि १० रुपये दराने लाच घेतल्याचे समोर आले. पवार हे ईडीकडून अटकेची कारवाई झालेल्या पहिल्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी ठरले आहेत.
ईडीच्या चौकशीत महापालिका अधिकारी, नगररचना विभाग, अभियंते, वास्तूविशारद, सीए आणि दलाल यांच्या संगनमताने भ्रष्टाचाराचे जाळे विणल्याचे उघड झाले आहे. आता मुख्य सूत्रधार पवार यांना अटक झाल्याने बेकायदेशीर परवानग्या मिळविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनाही धास्ती बसली आहे.
नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, “अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, यामुळे शहराचे नाव खराब होते,” असा संताप व्यक्त केला आहे.