दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन; श्रमिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला
पुणे : हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर आणि असंघटित कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव (वय 95) यांचे निधन झाले. मागील दहा दिवसांपासून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर प्राण सोडले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त
डॉ. आढाव यांची प्रकृती बिघडल्यानंतर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही रुग्णालयात भेट देत तब्यतीची विचारपूस केली होती. श्रमिक चळवळीचा आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचा निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे खरे नेते अशी त्यांची ओळख होती.
कष्टकरी संघटनाचा आजीवन ध्यास
असंघटित कामगारांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम कामगारांचे संघटन करीत 1963 मध्ये स्थापन केलेली “हमाल पंचायत” ही देशातील पहिल्या असंघटित कामगार संघटनांपैकी एक मानली जाते.
बालपणापासून संघर्षाचे वारस
त्यांचे वडील पांडुरंग आढाव यांचा मसूर व्यवसाय आर्थिक मंदीत बंद पडला आणि बाबा आढाव अवघे तीन महिन्यांचे असताना वडिलांचे निधन झाले. आई बाबूटाई यांनी पुण्यातील नाना पेठेत त्यांचे आणि चार भावंडांचे कष्ट करून पालनपोषण केले. भाऊ बापूसाहेब झेंडे यांनीही त्यांना मोठा आधार दिला.
शिक्षण, वैद्यकीय व्यवसाय आणि समाजवादी विचार
• प्राथमिक शिक्षण : पुणे महापालिकेची सार्वजनिक शाळा
• उच्च शिक्षण : शिवाजी मराठा शाळा
• वैद्यकीय पदवी : 1952, ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालय
• वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात : नाना पेठ, पुणे
लहानपणीच भाऊसाहेब रानडे, एस.एम. जोशी, एन.जी. गोरे, राममनोहर लोहिया यांच्यासारख्या समाजवादी विचारवंतांनी त्यांना प्रेरित केले. राष्ट्र सेवा दलात भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापू काळदाते आदींसह त्यांनी सक्रिय काम केले.
दुष्काळात कष्टकऱ्यांची साथ – आयुष्याचा टर्निंग पॉईंट
1952 च्या दुष्काळात काही हमालांनी त्यांच्याकडे नेतृत्वाची विनंती केली. महागाई व रेशनिंगविरोधात त्यांनी सत्याग्रह केला आणि 3 आठवड्यांचा तुरुंगवास भोगला. यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसायापेक्षा समाजकार्याला आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
राजकारणातही सक्रिय – वंचितांसाठी लढा
बाबा आढाव भवानी पेठ मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवक म्हणून त्यांनी मुख्यतः झोपडपट्टी पुनर्वसन, गरीबांसाठी सुविधा आणि श्रमिकांच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावली.
श्रमिकांचा खरा तारणहार हरपला
आयुष्यभर कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी, सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने श्रमिक चळवळीसोबतच सामाजिक चळवळींमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या क्रांतिकारक कार्याचा ठसा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.