पावसाचा मोठा खंड, खरीप पिकांवर संकट! नुकसानग्रस्त भागांत तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
राज्यातील काही भागांत पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या भागांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पावसाची तूट असलेल्या भागांमध्ये पिकांची सद्यःस्थिती तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसाला १२ तास वीज देण्याचे आणि जळालेले रोहित्र तातडीने बदलण्याचे निर्देशही देण्यात आलेत.
राज्यात काही भागांत पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पीकपाणी आणि पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला.
ज्या भागात पावसाचा मोठा खंड पडला आहे आणि त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्या भागांचं तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पावसाची तूट असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. विदर्भात सुमारे ३५ टक्के पावसाची तूट असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण कमी आहे.
पिकं वाचवण्यासाठी १२ तास वीज
पावसाचा खंड वाढल्याने अनेक ठिकाणी पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत पिकांना आवश्यक सिंचन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पिकांना पाणी देण्यासाठी दिवसाला १२ तास वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तसंच, वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण करणारे जळालेले रोहित्र तातडीने बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नुकसान झाल्यास पंचनाम्यांच्या आधारे भरपाई
पावसाअभावी ज्या भागात पिकं वाचवणं शक्य होणार नाही, त्या ठिकाणी सर्वेक्षण आणि पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्यांच्या आधारे नुकसान निश्चित करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पुढील आठवड्यातही पावसाची शक्यता कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी, बीड, हिंगोलीसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पॅकेज किंवा विशेष उपाययोजना करण्यात येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
त्यावर सध्या सर्वप्रथम पंचनामे करणं महत्त्वाचं असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. पाऊस परतला आणि पावसाची तूट भरून निघाली तर परिस्थिती सुधारेल अन्यथा सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.
जलसाठ्याचं वर्षभराचं नियोजन
पावसाच्या खंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचंही वर्षभराचं नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील विविध जलसाठ्यांमध्ये सध्या किती पाणी उपलब्ध आहे, त्याचा पुढील काळात कशा पद्धतीने वापर करता येईल आणि शेतीसाठी पाणी कसं उपलब्ध करून देता येईल, याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उपलब्ध पाणी आणि जलसाठे जपून वापरण्याची गरज असल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.