सोयाबीन पेरणीत होणाऱ्या चुका टाळा, उगवण चांगली हवी असेल तर ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा!
वेळेवर पेरणी करूनही उगवण कमी होतेय? दुबार पेरणी टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
एपीएमसी न्यूज नेटवर्क:
खरीप हंगामाला सुरुवात होताच राज्यभरातील शेतकरी शेताची मशागत, बियाणे व खतांची उपलब्धता, पेरणी यंत्रांची दुरुस्ती, फवारणी पंपांची तयारी अशा विविध कामांत व्यस्त झाले आहेत. मान्सून सक्रिय झाल्यानंतर पेरणीला वेग येतो. प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते की, वेळेवर पेरणी झाल्यानंतर बियाण्यांची चांगली उगवण व्हावी आणि त्यातून सुदृढ, निरोगी पीक तयार व्हावे.
मात्र अनेकदा पेरणीनंतर अपेक्षित उगवण होत नाही. काही ठिकाणी बियाणे उगवतच नाही, तर काही ठिकाणी रोपांची संख्या अत्यंत कमी राहते. परिणामी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो, हंगाम हातचा जाण्याची भीती निर्माण होते आणि आर्थिक नुकसानासह मानसिक तणावही वाढतो.
अशा परिस्थितीत अनेकदा बियाणे उत्पादक किंवा विक्रेत्यांवर दोषारोप केले जातात. काही प्रकरणांमध्ये भरपाईसाठी सरकारी यंत्रणांकडे धाव घ्यावी लागते. या प्रक्रियेत वेळ, पैसा आणि मनस्ताप या तिन्हींचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.
कृषी तज्ज्ञांच्या मते, बियाण्यांची उगवण केवळ बियाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून नसून पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतरच्या अनेक बाबी त्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात. योग्य नियोजन आणि शिफारसींचे पालन केल्यास उगवण चांगली होऊन उत्पादनातही वाढ होऊ शकते.
सोयाबीन पेरणीपूर्वी या १० बाबींकडे विशेष लक्ष द्या :
* वाहतुकीदरम्यान बियाण्यांची योग्य हाताळणी करावी.
* बियाण्यांची योग्य पद्धतीने साठवणूक करावी.
* जमिनीची योग्य मशागत करून योग्य वेळेत आणि योग्य खोलीवर पेरणी करावी.
* शिफारशीनुसार बियाण्याचे प्रमाण (बियाणे दर) वापरावे.
* जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी.
* पेरणीनंतर अतिवृष्टी झाल्यास आवश्यक उपाययोजना कराव्यात.
* पेरणीपूर्वी किंवा उगवणीपूर्वी वापरण्यात येणाऱ्या तणनाशकांचा योग्य वापर करावा.
* जास्त ओलावा आणि उबदार तापमानामुळे बियाणे कुजणार नाही याची काळजी घ्यावी.
* आपल्या विभागासाठी शिफारस केलेल्या वाणांचीच निवड करावी.
* पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी या सर्व बाबींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. योग्य नियोजन, दर्जेदार बियाणे आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केल्यास दुबार पेरणीची वेळ टाळता येईल आणि सोयाबीनचे निरोगी व भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल.