मुंबई APMC फळ मार्केटमध्ये ४३ हजारांची लाच घेताना दोघे ACB च्या ताब्यात
माथाडी कामगाराच्या रजिस्टर पावतीवर सहीसाठी ५५ हजारांची मागणी तडजोडीनंतर ४३ हजारांवर व्यवहार
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC ) फळ बाजारातील किराणा बाजार व दुकाने माथाडी मंडळाच्या कार्यालयात माथाडी कामगाराच्या रजिस्टर पावतीवर सही करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर ४३ हजार रुपये स्वीकारताना दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. या कारवाईमुळे माथाडी कामगारांच्या नोंदणी आणि कामाच्या वाटपाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात लोकसेवक भरत राजाराम कदम (५६), कामिक प्रभारी निरीक्षक आणि खासगी सुरक्षा रक्षक विजय नारायण पवार (३२) यांचा समावेश आहे. तक्रारदाराने माथाडी कामगार म्हणून नियुक्तीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर रजिस्टर पावतीवर सही करून देण्यासाठी पवार यांनी स्वतःसाठी ५ हजार रुपये आणि कदम यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तडजोडीनंतर ४३ हजारांची मागणी
तक्रारीनंतर एसीबीने ५ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी तडजोडीनंतर ४३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.
सायंकाळी ६.४७ वाजता कार्यालयातील केबिनमध्ये पंचांसमक्ष ४३ हजार रुपये स्वीकारताना कदम आणि पवार यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वसुलीचा आरोप
दरम्यान, या कारवाईनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून माथाडी कामगारांकडून पैशांची वसुली केली जात असल्याचा आरोप काही कामगारांनी केला आहे. त्यामुळे केवळ या प्रकरणापुरती चौकशी न करता, आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारे आणखी किती माथाडी कामगारांकडून पैसे घेतले आहेत, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पूर्वीच्या तक्रारी तसेच रजिस्टर पावतीवर सही, कामगार नोंदणी आणि काम देण्याच्या प्रक्रियेत पैशांची मागणी करण्यात आली होती का, याचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.
‘मर्जीतील टोळ्यांना काम, मूळ कामगारांवर अन्याय’
माथाडी कामगारांच्या टोळ्यांमध्ये नवीन कामगारांचा समावेश तसेच नवीन गोदामांमध्ये काम देताना मंडळाकडून नोंदणी केली जाते. मात्र, काही व्यापारी आणि कामगार मंडळातील व्यक्ती संगनमत करून मर्जीतील कामगारांच्या टोळ्यांना काम देतात आणि प्रत्यक्ष नोंदणीकृत कामगारांना कामापासून दूर ठेवतात, असा आरोप काही माथाडी कामगारांनी केला आहे.
एपीएमसीमधील काही व्यापाऱ्यांनी एमआयडीसी परिसरात गोदाम घेतल्यास तेथे नियमानुसार नोंदणीकृत माथाडी कामगारांकडून मालाची चढ-उताराची कामे होणे अपेक्षित असते. मात्र, काही ठिकाणी संबंधित व्यापारी, माथाडी युनियन आणि मंडळातील काही व्यक्तींच्या संगनमताने बाहेरील किंवा मर्जीतील कामगारांना काम दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आता मंडळातील इतर अधिकाऱ्यांचीही चौकशीची मागणी
माथाडी कामगारांच्या नोंदणीपासून कामाच्या वाटपापर्यंतच्या प्रक्रियेत पारदर्शकता आहे का, तसेच व्यापारी आणि माथाडी मंडळातील काही अधिकारी यांच्यात संगनमत आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
‘एका अधिकाऱ्याच्या कारवाईपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता, यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी किती कामगारांकडून अशा प्रकारे पैसे घेण्यात आले, याचा तपास करावा,’ अशी मागणी माथाडी कामगारांकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक निता भासेले असून, पर्यवेक्षक अधिकारी धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.