पणन मंत्री रावल यांचा कृषी बाजारपेठांच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकार; महाराष्ट्र-नेदरलँड्स भागीदारीला नवी दिशा
नेदरलँड्ससोबत कृषी भागीदारी व्यापक करण्याच्या दिशेने पाऊल दापचरी आंतरराष्ट्रीय कृषी बाजार, कोल्ड-चेन, निर्यात आणि आधुनिक लॉजिस्टिक्सवर चर्चा
मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विकास, शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि आधुनिक कृषी बाजारपेठांची उभारणी करण्यासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील फलोत्पादन, कृषी निर्यात, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि कृषी-लॉजिस्टिक्स क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी नेदरलँड्ससोबतची भागीदारी अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
नेदरलँड्सचे अन्न सुरक्षा, मत्स्यव्यवसाय व फलोत्पादन मंत्री सिल्व्हियो एर्कन्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या या बैठकीत दापचरी आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराची उभारणी, वाढवण बंदर ते रॉटरडॅम कनेक्टिव्हिटी, MAGNET 2.0 अंतर्गत ग्रीनफिल्ड कृषी क्लस्टर्स, कोल्ड-चेन, कृषी निर्यात, रोबोटिक्स आणि हवामान-लवचिक शेती या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आधुनिक कृषी बाजारपेठ उभारण्यावर भर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतमालाची साठवणूक व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी आणि निर्यातक्षम कृषी उत्पादनांना चालना मिळावी, यासाठी आधुनिक बाजारपेठांची उभारणी महत्त्वाची मानली जात आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून कृषी बाजारपेठांचे आधुनिकीकरण आणि जागतिक बाजारव्यवस्थेशी जोडणी करण्याच्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करण्याच्या विषयासह कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी आधुनिक कोल्ड-चेन, निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स यांवर झालेली चर्चा या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.
Wageningen च्या सहकार्याने उत्कृष्टता केंद्राची शक्यता
तळेगाव येथील NIPHT संस्थेचा Wageningen सोबतच्या सहकार्याने इंडो-डच उत्कृष्टता केंद्र म्हणून विकास करण्याच्या शक्यतेवरही बैठकीत विचारविनिमय झाला. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि हवामान बदलांना तोंड देणाऱ्या शेतीपद्धतींचा विकास यासाठी या सहकार्याचा उपयोग होऊ शकतो.
शेतमालाला जागतिक बाजारपेठेची संधी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे आणि शेतमालाचे मूल्य वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हा या सहकार्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. नेदरलँड्सचा कृषी तंत्रज्ञान आणि निर्यात व्यवस्थेतील अनुभव महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरू शकतो.
बैठकीला कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पणन सचिव प्रवीण दराडे, कृषी सचिव परिमल सिंह, तसेच नेदरलँड्सच्या कृषी, मत्स्यव्यवसाय, अन्न सुरक्षा व निसर्ग मंत्रालयाचे महासंचालक मार्टन व्हॅन डेनबर्ग, कृषी सल्लागार मॅरियन व्हॅन शाइक आणि मुंबईतील महावाणिज्यदूत नबील तौआती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.