दूष्काळात शेतकरी संकटात, सरकारचा खर्चाला लगाम, राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC मध्ये मात्र कोट्यवधींची उधळपट्टी?
धान्य मार्केटच्या ४०.५४ कोटींच्या काँक्रिटीकरणाची प्रक्रिया सुरू असताना पुन्हा ३३.८० लाखांच्या पॅचवर्कचा प्रस्ताव!
एकाच रस्त्यावर वारंवार पॅचवर्क, कोट्यवधींचा खर्च आणि जुन्या कामांचा टिपण्णीत उल्लेख नाही अभियंता पांडुरंग पिंगळे यांच्या कारभाराची चौकशी होणार का?
अभियांत्रिकी विभाग पणन मंत्री ,अध्यक्ष आणि सचिवांची दिशाभूल केल्याचा व्यापारी घटकांचा आरोप.
राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष-सचिवांनी आता डोळे उघडे ठेवून कारभार पाहण्याची गरज नाही तर येणार अडचणीत!
नवी मुंबई: राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना राज्य सरकारने अनावश्यक खर्चाला लगाम घालण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) धान्य मार्केटमध्ये रस्त्यांच्या कामांवरून वेगळेच चित्र समोर येत आहे. एकीकडे सुमारे ४० कोटी ५४ लाख रुपयांच्या खर्चातून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे याच बाजार आवारातील खड्डे बुजविणे, मॅस्टिक आणि डांबरीकरणाच्या पॅचवर्कसाठी पुन्हा ३३ लाख ८० हजार ६८० रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मे २०२४ मध्ये याच मार्केटमध्ये पॅचवर्कची कामे झाल्याचे बाजार घटकांचे म्हणणे आहे.
धान्य मार्केटमध्ये रस्त्यांच्या कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद खेळ सध्या सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत रस्ते डांबरीकरण, पॅचवर्क, काँक्रिटीकरण आणि फुटपाथच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे बाजार घटकांचे म्हणणे असताना, पुन्हा त्याच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नव्याने मंजुरी मिळविण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे, अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता पांडुरंग पिंगळे यांनी सादर केलेल्या टिपण्णीत यापूर्वी झालेल्या अनेक महत्त्वपूर्ण कामांचा आणि खर्चाचा उल्लेख नसल्याने राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष पणन मंत्री जयकुमार रावल आणि सचिव यांची दिशाभूल होत असल्याचा गंभीर आरोप व्यापारी घटकांकडून करण्यात येत आहे. अभियंत्यांच्या अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवून मंजुरी दिल्यास उद्या अध्यक्ष आणि सचिवांनाच अडचणीत आणण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष आणि सचिवांनी आता 'डोळे उघडे ठेवून' प्रत्येक कागदपत्र, खर्च आणि कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी. अन्यथा अभियांत्रिकी विभागाच्या या कारभाराची जबाबदारी वरिष्ठांवरही येऊ शकते! ठेकेदारांना वारंवार कामे मिळवून देण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
४०.५४ कोटींचे काँक्रिटीकरण पुन्हा ३३.८० लाखांचा खर्च कशासाठी?
धान्य मार्केटमधील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे ४० कोटी ५४ लाख रुपयांच्या कामाला १८ एप्रिल २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार कलम १२(१) अंतर्गत मंजुरीनंतर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्राप्त निविदांमध्ये मे. इंद्रदीप इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीने अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा ०.००१ टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे. या कंपनीला काम देण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असल्याचे अभियांत्रिकी विभागाच्या टिपण्णीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत मार्केटमधील सुमारे ४८ हजार ४८७ चौरस मीटर क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. मात्र, याच रस्त्यांवरील सुमारे १ हजार ८६९.८४ चौरस मीटर क्षेत्रात खड्डे पडल्याचे कारण देत ते बुजविण्यासाठी स्वतंत्रपणे ३३ लाख ८० हजार ६८० रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
संपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण होण्यासाठी २० महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याने तोपर्यंत वाहतुकीसाठी तात्पुरती दुरुस्ती आवश्यक असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. मात्र, काँक्रिटीकरणाच्या कामाची व्याप्ती आणि नव्या पॅचवर्क प्रस्तावाची व्याप्ती यांची तांत्रिक तुलना झाली आहे का? दोन्ही कामांमध्ये एकाच रस्त्यांचा समावेश आहे का? आणि नव्या कामाचा खर्च काँक्रिटीकरणाच्या ठेकेदाराच्या जबाबदारीत येतो का? याची स्पष्टता होणे आवश्यक आहे.
मे २०२४ मध्ये पॅचवर्क मग पुन्हा खड्डे कसे?
या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मे २०२४ मध्ये धान्य मार्केटमधील रस्त्यांवर पॅचवर्क करण्यात आल्याची माहिती बाजार घटकांकडून देण्यात येत आहे. त्यावेळी डांबरीकरणानंतर रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याने तत्कालीन सचिव खंडागळे यांनी पाहणी दौरा केला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून पॅचवर्कचे काम करून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, त्यावेळीही अभियांत्रिकी विभागात उपअभियंता पांडुरंग पिंगळे कार्यरत होते. त्यामुळे आता पुन्हा त्याच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र खर्चाचा प्रस्ताव सादर झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
मे २०२४ मध्ये झालेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? संबंधित ठेकेदाराचा दोष निवारण कालावधी किती होता? तो संपला आहे का? दोष निवारण कालावधीत रस्त्यांवर खड्डे पडले असल्यास दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची होती की बाजार समितीच्या तिजोरीतून पुन्हा खर्च करायचा? या प्रश्नांची उत्तरे अभियांत्रिकी विभागाने देणे आवश्यक आहे.
पाच वर्षांत २५ कोटींहून अधिक कामांचा दावा हिशेब कुठे?
व्यापारी घटकांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत धान्य मार्केटमध्ये रस्ते डांबरीकरण आणि फुटपाथच्या कामांसाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाइनसाठी ३.४० कोटी रुपये, तसेच ए, बी, सी आणि डी धक्क्यांवरील ड्रेनेज दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. २०२२-२३ मध्ये सी आणि डी विंग परिसरात काँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली. त्यासोबत फुटपाथ आणि डांबरीकरणासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे बाजार घटकांचे म्हणणे आहे. २०२४ मध्ये पुन्हा सुमारे ७.५० कोटी रुपयांची डांबरीकरण आणि पॅचवर्कची कामे हाती घेण्यात आल्याचाही दावा करण्यात येत आहे.
या सर्व खर्चाची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. कारण वेगवेगळ्या वर्षांत झालेली कामे, त्यांची व्याप्ती आणि त्यावरील प्रत्यक्ष खर्च यांचा एकत्रित हिशेब तपासल्याशिवाय सध्याच्या प्रस्तावाची आवश्यकता निश्चित करता येणार नाही.
अभियंत्यांच्या टिपण्णीत पूर्वीच्या कामांचा उल्लेख का नाही?
सध्या ३३.८० लाखांच्या पॅचवर्कसाठी सादर करण्यात आलेल्या टिपण्णीवर व्यापारी घटकांनी आक्षेप घेतला आहे. यापूर्वी रस्ते डांबरीकरण, पॅचवर्क, काँक्रिटीकरण आणि ड्रेनेजवर झालेल्या कोट्यवधींच्या खर्चाचा संपूर्ण तपशील प्रस्तावात नमूद आहे का, हा मुख्य प्रश्न आहे.
उपअभियंता पांडुरंग पिंगळे यांनी सादर केलेल्या टिपण्णीत पूर्वीच्या कामांचा, संबंधित ठेकेदारांचा, खर्चाचा आणि कामांच्या सद्यस्थितीचा तपशील पुरेसा नसल्याचा आरोप तसेच एकाच काम त्याच जागेवर दोन ते तीन वेळा करण्यात आलेला आहे अशी माहिती व्यापारी घटकांकडून करण्यात येत आहे.
जर पूर्वीच्या कामांची माहिती निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पूर्णपणे आली नसेल, तर नव्या प्रस्तावाच्या मंजुरीवेळी आर्थिक निर्णय चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीवर आधारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित टिपण्णीची पडताळणी करून त्यात पूर्वीच्या कामांचा संपूर्ण तपशील करून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील काँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरण का?
२०१९ नंतर दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १२ ते १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे व्यापारी घटकांचे म्हणणे आहे. मात्र, मूळ उद्देशानुसार अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण कितपत झाले आणि शॉप-कम-गोदाम परिसरात डांबरीकरणाची कामे का करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मूळ मंजूर प्रस्ताव, प्रत्यक्षात करण्यात आलेली कामे आणि त्यासाठी अदा करण्यात आलेली बिले यांची तुलना करणे आवश्यक आहे. मंजूर कामांचे स्वरूप बदलले असल्यास त्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतली होती का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.यामुळे दुसऱ्या टप्प्यातील रस्ते विकासकामांच्या मूळ उद्देशापासून प्रत्यक्ष कामे वेगळी झाली का, हा मुद्दाही तपासणीच्या केंद्रस्थानी आला आहे.
दोष निवारण कालावधीची तपासणी होणार का?
रस्त्यांच्या कामांमध्ये ठेकेदाराला ठरावीक दोष निवारण कालावधीची जबाबदारी असते. या काळात कामात दोष आढळल्यास करारातील अटींनुसार दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असू शकते. मात्र, धान्य मार्केटमध्ये पूर्वीच्या डांबरीकरण आणि पॅचवर्कनंतर पुन्हा खड्डे पडत असतील, तर संबंधित कामांच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी मोजमाप पुस्तिका (एमबी), वर्क ऑर्डर, बिलांची देयके, गुणवत्ता तपासणी अहवाल आणि दोष निवारण कालावधीची कागदपत्रे तपासली पाहिजेत.
प्रत्येक वेळी नव्याने निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याऐवजी आधीच्या कामातील दोषांसाठी संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी व्यापारी घटकांची मागणी आहे.
अध्यक्ष आणि सचिवांनी स्वतंत्र चौकशी करावी!
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये पारदर्शक आर्थिक कारभार राखण्याची जबाबदारी अध्यक्ष तथा पणन मंत्री जयकुमार रावल आणि सचिव यांच्यावर आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागाकडून सादर होणाऱ्या प्रस्तावांची केवळ टिपण्णीच्या आधारे मंजुरी न देता त्यांची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक तपासणी होणे आवश्यक आहे.
व्यापारी घटकांनी २०१९ पासून आजपर्यंत धान्य मार्केटमध्ये झालेल्या सर्व रस्ते, डांबरीकरण, पॅचवर्क, काँक्रिटीकरण, फुटपाथ आणि ड्रेनेजच्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.या मध्ये मंजूर अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, प्रत्यक्ष कामाची व्याप्ती, मोजमाप पुस्तिका, ठेकेदारांना अदा केलेली बिले, गुणवत्ता तपासणी आणि दोष निवारण कालावधी या सर्व बाबींचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे. कामांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित अभियंते आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या पैशातून उभारलेल्या राष्ट्रीय बाजारात प्रत्येक रुपयाचा हिशेब पारदर्शक असणे आवश्यक आहे. ४० कोटींच्या काँक्रिटीकरणाची प्रक्रिया सुरू असताना ३३.८० लाखांच्या पॅचवर्कचा प्रस्ताव का आला, हा प्रश्न केवळ एका कामापुरता मर्यादित नाही. यापूर्वीच्या कोट्यवधींच्या कामांचा हिशेब तपासल्याशिवाय नव्या खर्चाला मंजुरी देणे योग्य ठरेल का, याचा निर्णय आता पणन मंत्री आणि सचिवांनी घ्यायचा आहे.