हिंगोली : हळदीच्या विक्रमी आवकेमुळे संत नामदेव मार्केट यार्ड गच्च भरले, नवीन आवक तात्पुरती बंद
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची विक्रमी आवक होत असून संपूर्ण यार्ड हळद घेऊन आलेल्या वाहनांनी गच्च भरले आहे. वाढत्या आवकेमुळे बाजार समिती प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात नवीन हळद आवक स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या यार्डात दररोज सुमारे 4 ते 5 हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. त्यामुळे साठवण क्षमता आणि मोजमाप यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून दाखल झालेल्या हळदीचे मोजमाप आणि लिलाव प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने नवीन माल स्वीकारणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
रविवारी बाजार समितीला सुटी असल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी दाखल झाली. परिणामी ट्रक, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून यार्डात जागेची कमतरता निर्माण झाली आहे.
बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रलंबित हळदीचे मोजमाप आणि विक्री प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन आवक स्वीकारली जाणार नाही. याबाबत शेतकरी, अडत व्यापारी आणि खरेदीदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यंदा हळदीला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. मात्र वाढलेल्या आवकेमुळे लिलाव प्रक्रियेला विलंब होत असून अनेक शेतकऱ्यांना बाजार समिती परिसरात प्रतीक्षा करावी लागत आहे.