सणासुदीत तांदळाचा तडका! घाऊक दरांत ४० ते ५० टक्क्यांची वाढ
वाडा कोलम ६० रुपयांवरून ८० रुपयांवर सुरती कोलमचे दरही वाढले, किरकोळ बाजारात ग्राहकांना महागाईचा फटका
नवी मुंबई : सणासुदीच्या काळात तांदळाच्या दरांत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई एपीएमसीच्या घाऊक धान्य बाजारात तांदळाच्या विविध प्रकारांच्या दरांत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारातील दरवाढीचे पडसाद किरकोळ बाजारातही उमटत असून, ग्राहकांना आता तांदळासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या तांदळाची प्रत्येक घरात नियमित खरेदी केली जाते. त्यामुळे सणासुदीच्या काळात तांदळाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर अतिरिक्त ताण पडत आहे. सणासाठीच्या इतर खरेदीसोबतच जीवनावश्यक धान्याच्या वाढलेल्या किमतींचाही सामना ग्राहकांना करावा लागत आहे.
वाडा कोलम ८० रुपयांवर
मुंबई एपीएमसीच्या घाऊक धान्य बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या वाडा कोलम तांदळाचा दर प्रतिकिलो ६० रुपयांवरून सरासरी ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर सुरती कोलमचा दर ५० रुपयांवरून ६५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. सर्वसामान्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या परिमल आणि मसुरी तांदळाचे घाऊक दरही प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
किरकोळ बाजारात वाडा कोलमसाठी प्रतिकिलो ८५ ते ९० रुपये, तर सुरती कोलमसाठी ७५ ते ७९ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे.
अनियमित पावसाचा उत्पादनाला फटका?
तांदळाला वर्षभर मागणी असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेचा परिणाम तांदळाच्या उत्पादनावर होत असल्याचे सांगितले जात आहे. देशातील विविध राज्यांमध्ये पावसाच्या बदलत्या स्थितीमुळे उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्यास बाजारभावावरही त्याचा प्रभाव पडू शकतो. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि उपलब्ध पुरवठा यांचाही दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तांदळाच्या दरवाढीमागील नेमकी कारणे आणि पुरवठ्याची स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच भाववाढीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. मात्र, सध्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना सणासुदीत महाग तांदूळ खरेदी करण्याची वेळ आली आहे.