बारामतीत ‘कृषिक प्रदर्शनाला’ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद AI शेतीकडे युवकांचा ओढा
-१३० एकरांवर भव्य कृषी प्रदर्शन युवा शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती
-एआय तंत्रावर आधारित ऊस शेती आकर्षणाचा केंद्रबिंदू
-शरद पवारांकडून ‘एआय’ शेती प्रात्यक्षिकांची पाहणी कौतुकाची थाप
-हायड्रोपोनिक, रोबोटिक तणनियंत्रणासह आधुनिक शेती तंत्रांची झलक
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीच्या नव्या पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे बदलत असलेली देश-विदेशांतील शेती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी बारामतीत आयोजित ‘कृषिक-२०२६’ या भव्य कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारपासून (ता. १७) बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू झालेल्या या प्रदर्शनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून, युवा शेतकऱ्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरत आहे.
तब्बल १३० एकरांवर साकारलेल्या भव्य प्रक्षेत्रांमध्ये आधुनिक शेतीची दिशा दाखविणारी विविध दालने उभारण्यात आली आहेत. ‘अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ संचलित बारामती कृषी विज्ञान केंद्र आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात एआय तंत्रावर आधारित दोनशे टनांपर्यंत उत्पादन देणारी ऊस शेती, नैसर्गिक शेती, हायड्रोपोनिक भाजीपाला तंत्रज्ञान, विदेशी फुलशेती व भाजीपाला उत्पादन, रोबोटिक तणनियंत्रण, आधुनिक कृषियंत्रे व अवजारे, प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म सिंचन, पशुधन व दुग्धविकास, कृषी वित्तपुरवठा तसेच कृषी शिक्षण व संशोधन अशा विविध विषयांवरील सखोल माहिती देणारी दालने उभारण्यात आली आहेत.
दरम्यान, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘कृषिक’मधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पीक प्रात्यक्षिकांची पाहणी करत या तंत्रज्ञानाचे कौतुक केले. भविष्यात शाश्वत आणि अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी एआय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकूणच आधुनिक तंत्रज्ञान, नव्या संधी आणि संशोधनाची दिशा दाखवणारे ‘कृषिक-२०२६’ प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून, शेतीच्या भविष्यासाठी आशादायी चित्र निर्माण करत आहे.