Mango Export : लासलगावहून १०१६ टन हापूस-केशर आंब्याची परदेशात निर्यात; अमेरिका अव्वल
Mango Export News: नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) कृषक विकिरण केंद्रातून यंदाच्या हंगामात तब्बल १०१६ मेट्रिक टन हापूस आणि केशर आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. या आंब्यांवर विकिरण प्रक्रिया करून त्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया येथे पाठविण्यात आले.
प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन लाख बॉक्समधील १०१६ टन आंब्यांवर विकिरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये अमेरिकेला सर्वाधिक ९९७ मेट्रिक टन, ऑस्ट्रेलियाला १३ मेट्रिक टन आणि मलेशियाला ३ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली आहे.
लासलगाव येथील केंद्रात २००२ ते २००६ दरम्यान कांद्यावर विकिरण प्रक्रिया केली जात होती. २००७ पासून आंब्यावरही प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या हिंदुस्थान अॅग्रो लिमिटेड या कंपनीकडे प्रकल्पाचे संचालन आहे.
गॅमा किरणांद्वारे करण्यात येणाऱ्या या प्रक्रियेमुळे आंब्यातील कीड नष्ट होते, फळाचा टिकाऊपणा वाढतो आणि चव व ताजेपणा कायम राहतो. त्यामुळे परदेशी बाजारपेठांमध्ये भारतीय आंब्यांची मागणी वाढत आहे.
हापूस, केशर, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, लंगडा आणि चौसा यांसारख्या विविध आंबा जातींची निर्यात होत असून, या केंद्रामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे.