अवकाळी पावसाचा फटका, तरीही बाजारात द्राक्षे-स्ट्रॉबेरी-अंजीराची रंगत
-हंगाम उशिरा, दर चढे वाशी फळबाजारात हंगामी फळांची जोरदार आवक
-लाल चुटुक स्ट्रॉबेरीने वेधले लक्ष, मधुर अंजीरांचीही मागणी वाढली
-द्राक्ष्यांचे दर दुप्पट, पण ग्राहकांची मागणी कायम
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
मुंबई APMC होलसेल फळ बाजारात सध्या द्राक्षे, स्ट्रॉबेरी आणि अंजीराचा हंगाम सुरू आहे.मात्र गेल्यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे या हंगामाला यंदा उशिराने सुरुवात झाली आहे.अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने
शेतकऱ्यांना पुन्हा लागवड करावी लागली,त्याचा परिणाम फळांच्या उशिरा झालेल्या आवकीवर दिसून येतोय.
कृषी क्षेत्रातील प्रगतीमुळे आज अनेक फळे वर्षभर उपलब्ध असली, तरी द्राक्षे, स्ट्रॉबेरी आणि अंजीर ही फळे आजही त्यांच्या ठराविक हंगामातच बाजारात येतात. दिवाळीनंतर दरवर्षी हिरवी, पिवळी आणि काळी द्राक्षे बाजारात दाखल होत असतात. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादन घटले असून आवक कमी असल्याने दर चढे राहिले आहेत.
घाऊक बाजारात सध्या नऊ किलो द्राक्षांची टोपली ९०० ते १,००० रुपयांना विकली जात असून, हे दर नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट आहेत. परिणामी किरकोळ बाजारातही द्राक्षांचे दर वाढले आहेत. तरीसुद्धा द्राक्षे उशिराने बाजारात आल्याने ग्राहकांकडून त्यांना चांगली मागणी असल्याचे व्यापारी दिलीप खोत यांनी सांगितले.
स्ट्रॉबेरीने वेधले लक्ष
यंदा स्ट्रॉबेरीची आवकही उशिराने सुरू झाली असली, तरी थंडीचा हंगाम लांबल्याने उत्पादन चांगले झाले आहे. अनुकूल हवामानामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असून, लाल चुटुक स्ट्रॉबेरी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात स्ट्रॉबेरीचे बॉक्स ५० ते १०० रुपयांदरम्यान उपलब्ध असून, महाबळेश्वरसोबतच नाशिक परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. दर समाधानकारक असल्याने स्ट्रॉबेरीला चांगला उठाव मिळत आहे.
मधुर अंजीरांची चवदार आवक
सध्या मधुर अंजीराचा हंगाम सुरू असल्याने घाऊक बाजारात दररोज ४० ते ५० क्विंटल अंजीराची आवक होत आहे. घाऊक बाजारात ८ ते १० मोठ्या अंजीरांचा एक बॉक्स ५० ते ६० रुपयांना उपलब्ध आहे. पुणे आणि फलटण परिसरातून ही अंजीरे बाजारात येत आहेत.
नाजूक फळ असल्याने अंजीराचा व्यापार मर्यादित काळासाठीच होतो. मात्र चव आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे ठराविक वर्गाकडून त्यांना मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात अंजीराचे बॉक्स सुमारे १०० रुपयांना विकले जात असून, आईस्क्रीम तयार करण्यासाठीही कंपन्यांकडून ओल्या अंजीरांना मागणी वाढली आहे.