तुरीला दमदार भाव; वाशिममध्ये विक्रमी ७,५९० क्विंटल आवक
वाशिम : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची विक्रमी आवक नोंदविण्यात आली असून, एका दिवसात तब्बल ७ हजार ५९० क्विंटल तूर विक्रीसाठी दाखल झाली आहे. विशेष म्हणजे बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढूनही तुरीच्या दरांवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसून दर मजबूत राहिल्याचे चित्र दिसून आले.
बाजार समितीतील लिलाव प्रक्रियेदरम्यान तुरीला किमान ७ हजार १२० रुपये तर कमाल ७ हजार ८७८ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत काही दिवसांपासून तुरीच्या दरात चांगली वाढ झाल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजार समितीकडे वळत आहेत. वाढत्या भावाचा फायदा घेण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील अनेक गावांमधून शेतकरी मोठ्या प्रमाणात तूर घेऊन बाजार समितीत दाखल होत आहेत.
दरम्यान, बाजारात विक्रमी आवक होऊनही दर टिकून राहिल्यामुळे आगामी काळातही तुरीच्या बाजारभावाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तूर उत्पादकांसाठी सध्या समाधानकारक परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्गामध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.