दिवाळीच्या तोंडावर मुंबई APMCच्या घाऊक बाजारात बदाम, काजू, अंजीर, अक्रोड महागले; पाहा मुंबई APMCतील सुकामेव्याचे नवे दर
सुकामेवा २०० ते ६०० रुपयांनी महाग!
पिस्ता, बदाम, काजू, अंजीर, अक्रोडच्या दरांत वाढ गिफ्ट पॅकही महागण्याची शक्यता
ममरा बदाम ५,४००, पाइन नट्स ६,००० किलोवर आयातीत तुटवडा, वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम
Dry Fruits Market Price Update: नवी मुंबई | दिवाळीच्या फराळात सुकामेव्याचा गोडवा वाढवायचा, की वाढत्या किमतींचा भार सहन करायचा, असा प्रश्न आता सर्वसामान्य ग्राहकांसमोर उभा राहिला आहे. दिवाळीचा सण जवळ येताच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) वाशी येथील सुकामेव्याच्या   बाजारात पिस्ता, बदाम, काजू, अंजीर, अक्रोड यांसह विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरांनी उसळी घेतली आहे. काही प्रकारांत किलोमागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे . त्यामुळे दिवाळीचा फराळ, मिठाई, लाडू आणि आकर्षक ड्रायफ्रूट्स गिफ्ट पॅक खरेदी करताना ग्राहकांना यंदा अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या काळात सुकामेव्याला मोठी मागणी असते. घरगुती फराळापासून मिठाईच्या दुकानांपर्यंत, तसेच नातेवाइकांना आणि व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंपर्यंत सुकामेव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, घाऊक बाजारातील दरवाढीमुळे किरकोळ विक्रीचे दर आणि गिफ्ट पॅकच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः मर्यादित बजेटमध्ये दिवाळीची खरेदी करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पिस्ता, बदाम, काजूच्या दरांत वाढ
मुंबई APMCच्या सुकामेवा बाजारात पिस्ता खारा प्रतिकिलो १,९०० ते २,१०० रुपये, तर हिरवा पिस्ता ३,००० ते ३,२०० रुपये दराने उपलब्ध आहे. पिस्ता स्लाइसचा दर सुमारे ३,००० रुपये किलो आहे. बदामाचे विविध प्रकार १,१०० ते १,५०० रुपये, तर काजूचे प्रकार ९५० ते १,५०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
अंजीराचे दर दर्जानुसार १,००० ते २,४०० रुपये, तर अक्रोडाचे विविध प्रकार ९०० ते २,२०० रुपये किलो आहेत. चारोळी २,४०० ते २,८०० रुपये आणि मखाना १,४०० ते १,६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. या दरांमुळे फराळासाठी सुकामेवा खरेदी करणाऱ्यांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
ममरा बदाम ५ हजार ४०० पाइन नट्स ६,००० हजार   किलोवर
महागड्या सुकामेव्यामध्ये ममरा बदामाचे दर विशेष लक्षवेधी ठरत आहेत. दर्जानुसार ममरा बदाम प्रतिकिलो २,६०० ते ५,४०० रुपये दराने उपलब्ध आहे. पाइन नट्सचे दर ५,६०० ते ६,००० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय ब्राझील नट्स ३,००० रुपये, पेकान नट्स २,२०० ते २,४०० रुपये आणि मॅकॅडेमिया नट्स २,६०० ते ३,००० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. हेझलनट्सचा दर सुमारे २,६०० रुपये किलो आहे.
खजुराचे प्रकार आणि दर्जानुसार २८० ते १,५०० रुपये किलो, साध्या मनुका ४८० ते ६०० रुपये, अफगाणी मनुका ८०० ते १,६०० रुपये आणि काळ्या मनुका ५२० ते १,२०० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. जर्दाळूचे दर ४०० ते १,००० रुपये, तर बदाम स्लाइसचे दर ९०० ते १,२०० रुपये किलोपर्यंत आहेत.
ड्रायफ्रूट्स गिफ्ट पॅकचे बजेटही वाढणार?
दिवाळीत सुकामेव्याचे आकर्षक पॅक भेट देण्याची परंपरा वाढत आहे. कार्यालये, व्यावसायिक आस्थापना आणि वैयक्तिक स्तरावरही ड्रायफ्रूट्स गिफ्ट पॅकला मागणी असते. मात्र, पिस्ता, बदाम, काजू आणि इतर महागड्या सुकामेव्याच्या दरांत वाढ झाल्याने या पॅकच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
वाळवलेल्या फळांमध्ये ब्लूबेरी १,४०० ते १,६०० रुपये, क्रॅनबेरी ६०० ते ८०० रुपये, वाळवलेला आंबा ७६० रुपये, संत्रे १,००० रुपये, कीवी ५६० रुपये आणि चेरी ८०० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. त्यामुळे सुकामेवा आणि वाळवलेल्या फळांचा समावेश असलेल्या प्रीमियम गिफ्ट पॅकसाठी ग्राहकांना अधिक खर्च करावा लागू शकतो.
आयातीत तुटवडा, वाहतूक खर्चाचा परिणाम
सुकामेव्याच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवडा, आयात शुल्क आणि वाहतूक खर्च ही प्रमुख कारणे असल्याचे घाऊक व्यापारी अमृत ढवळे यांनी सांगितले. इराण आणि अमेरिकेतून येणाऱ्या सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. बंदरातून मालाची आवक अपेक्षेप्रमाणे होत नसून, उपलब्ध बदामाच्या काही साठ्यांच्या दर्जाबाबतही प्रश्न असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.
आयातीत मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास आणि दिवाळीच्या काळात मागणी वाढल्यास दरांवर आणखी दबाव येऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात सुकामेव्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत किती महाग?
यंदा काही सुकामेव्याच्या प्रकारांत किलोमागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सुकामेवात २०० ते ६०० रुपये किलोने वाढ झाली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी सुकामेव्याचा दर्जा, प्रतिकिलो दर आणि पॅकमधील प्रत्यक्ष वजन तपासून खरेदी करणे आवश्यक ठरणार आहे. सणाचा आनंद कायम ठेवताना वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेटचे गणित मात्र बिघडण्याची शक्यता आहे.
मुंबई APMC सुकामेवा बाजारभाव
सुकामेव्याचा प्रकार दर (₹/किलो)
पिस्ता खारा १,९००–२,१००
हिरवा पिस्ता ३,०००–३,२००
पिस्ता स्लाइस ३,०००
बदाम १,१००–१,५००
ममरा बदाम २,६००–५,४००
टच ममरा २,२००–२,४००
बदाम स्लाइस ९००–१,२००
काजू ९५०–१,५००
मिरी काजू १,३००
खारा काजू १,१००–१,४००
लहान सालीचा काजू १,०००
मोठा सालीचा काजू १,१००
अक्रोड तुकडा १,४००–१,५००
अक्रोड १,८००–२,२००
अक्रोड गोळा ९००–१,०००
चारोळी २,४००–२,८००
अंजीर १,०००–२,४००
जर्दाळू ४००–१,०००
साधी मनुका ४८०–६००
अफगाणी मनुका ८००–१,६००
काळी मनुका ५२०–१,२००
मुनक्का ८००–१,२००
खजूर २८०–१,५००
मखाना १,४००–१,६००
ब्राझील नट्स ३,०००
पेकान नट्स २,२००–२,४००
मॅकॅडेमिया नट्स २,६००–३,०००
पाइन नट्स ५,६००–६,०००
हेझलनट्स २,६००
चिया सीड्स ३६०
ड्रायफ्रूट्स स्वीट भेळ १,१००
ड्रायफ्रूट्स तिखट भेळ १,१००
मिक्स ड्रायफ्रूट्स ७५०
ड्रायफ्रूट्समधील वाळवलेली फळे
प्रकार दर (₹/किलो)
ब्लूबेरी १,४००–१,६००
क्रॅनबेरी ६००–८००
आंबा ७६०
संत्रे १,०००
कीवी ५६०
काळे प्लम ६००
पोमेलो ६००
अननस ६००
चेरी ८००
लिंबू ६००
पपई ६००
आले ७००
ब्लॅक करंट ८००
मिक्स फ्रूट ६००