मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये FDAची कारवाई दोन पानटपऱ्या सील, डिलिव्हरी सिस्टीम”चा पर्दाफाश
भाजीपाला मार्केटमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांची मोठी अॅक्शन, गुटखा बॅगा जप्त करून केला नष्ट
“डिलिव्हरी सिस्टीम”चा धक्कादायक खुलासा! विंगमध्ये गुटखा पुरवठा
अशाच प्रकारची मोहीम इतर मार्केटमध्येही राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. R-25 आणि R-32 या दोन पानटपऱ्यांमध्ये गुटखा आढळल्यानंतर त्या दोन्ही टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर संपूर्ण मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनात आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर दूध, खाद्यपदार्थ आणि पानटपऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई APMC मार्केटमध्येही ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
विंगमध्ये गुटखा “डिलिव्हरी सिस्टीम”चा नवा फंडा उघड
कारवाईनंतर गुटखा विक्री करणाऱ्या टोळीने नवा मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक विंगमधील दुकानांपर्यंत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ पोहोचवण्यासाठी “डिलिव्हरी सिस्टीम”चा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजीपाला मार्केटचे मुख्य सुरक्षा अधिकारी भीमराव पाटील यांनी “ऑपरेशन गुटखा” राबवत कारवाई केली. या कारवाईदरम्यान एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून जप्त केलेल्या बॅगांमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळले.
ही सर्व सामग्री जागेवरच जाळून नष्ट करण्यात आली. या कारवाईनंतर गुटखा विक्रेत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशाच प्रकारची मोहीम इतर मार्केटमध्येही राबवावी, अशी मागणी होत आहे.
साखळी व्यवसायाचा आरोप
मार्केट परिसरात केवळ गुटखाच नव्हे तर तंबाखूजन्य पदार्थांचीही खुलेआम विक्री होत असल्याचे समोर आले आहे. काही टपऱ्यांमधून बिसलेरी पाणी, बिस्किटे आणि त्यानंतर गुटखा विक्रीपर्यंत साखळी व्यवसाय विस्तारल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
गंभीर प्रश्न उपस्थित
या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत—
* या दोन पानटपऱ्यांचे मूळ मालक कोण?
* त्या प्रत्यक्षात कोण चालवत होते?
* बाजार समितीने परवानगी कधी दिली?
* टपऱ्यांचे हस्तांतरण कोणाच्या संमतीने झाले?
* सध्याची कायदेशीर स्थिती काय?
चौकशीची मागणी तीव्र
बाजार घटकांकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच संबंधित टपऱ्या तात्काळ बाजार समितीकडून ताब्यात घेण्यात याव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे.
सार्वजनिक आरोग्य धोक्यात
मार्केट परिसरात वाढत चाललेल्या गुटखा विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
गुटखा रॅकेटवर झालेली ही कारवाई ही केवळ सुरुवात असल्याचे बोलले जात असून, या मागे असलेले संपूर्ण नेटवर्क उघड होणार का? याकडे आता संपूर्ण बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.