APMC सेस रद्द करण्यासाठी धुळ्यात MACCIAचं डिजिटल आंदोलन, पालकमंत्री रावलांचं व्यापाऱ्यांना आश्वासन!
एपीएमसीन्यूज़ नेटवर्क : व्यापारी आणि उद्योजकांवर लादण्यात आलेला मार्केट कमिटी सेस तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA)च्या वतीने राज्यव्यापी डिजिटल आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धुळ्यात MACCIAचे प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र (कैलाश) अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली.
यावेळी MACCIAच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेत त्यांना व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांचं सविस्तर निवेदन दिलं. मार्केट कमिटी सेसमुळे व्यापारी आणि उद्योजकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, त्याचा व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला.
सेस रद्द करून व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली.
मार्केट कमिटी सेसच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी व्यापारी आणि उद्योजकांची विशेष बैठक लवकरच आयोजित केली जाईल, असं आश्वासन पालकमंत्री रावल यांनी दिलं.
पालकमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे व्यापारी आणि उद्योजकांमध्ये या प्रश्नावर तोडगा निघण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
या वेळी MACCIAचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य किशोरचंद्र पोद्दार, कौशिक अग्रवाल, समन्वयक राहुल बैसाणे यांच्यासह स्थानिक व्यापारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.