मुंबई APMCमध्ये १५ टक्के कमिशनचा काळाबाजार?
नालेसफाईच्या कोट्यवधींच्या कामांवर एसीबीची नजर उपसचिवांसह स्वच्छता अधिकारी अटकेत
कंत्राटदारांची कामे पूर्ण होऊन त्यांच्या देयकांचे चेक तयार असूनही ते अद्याप सभापती आणि सचिव सह्या का करत नाही?
टक्केवारी” मिळत नसल्यामुळेच कंत्राटदारांचे चेक आणि गाळे व कार्यालय ट्रान्सफर फाईल रोखून ठेवण्यात आले होते का? याचाही तपास होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
पावसाळा तोंडावर आला असतानाही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) परिसरातील नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यातच नालेसफाई आणि साफसफाईच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेक्यांमध्ये १५ टक्के कमिशन घेतल्याशिवाय वर्क ऑर्डरच दिली जात नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी मोठी कारवाई करत APMCमधील दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपी डॉ. दिपक शरद आवटे (वय ४०), अतिरिक्त पदभार उपसचिव व आरोग्य अधिकारी   आणि समीर नारायण म्हात्रे (वय ५५), अतिरिक्त पदभार स्वच्छता अधिकारी यांना अटक करण्यात आली असून, दोघांनाही आज बेलापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीबीच्या प्राथमिक तपासात आरोपी समीर म्हात्रे आणि डॉ. आवटे यांनी “ही रक्कम आमच्यासाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी घेतली जात होती,” असे सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता एसीबीचा तपास “या १५ टक्के कमिशनचा अंतिम लाभार्थी कोण?” याकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रारदार हे मुंबई APMCमध्ये ठेकेदार म्हणून काम करतात. ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत चोकअप काढणे आणि वार्षिक देखभाल कामासाठी त्यांना टेंडर मंजूर झाले होते. मात्र वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर आरोपी अधिकाऱ्यांनी मंजूर बिलाच्या रकमेतून जीएसटी वगळून उर्वरित रकमेवर १५ टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या एका वर्षाच्या बिलाची रक्कम ११ लाख ९२ हजार ७१६ रुपये होती. त्यातून जीएसटी वगळल्यानंतर उर्वरित ९ लाख ७८ हजार २७ रुपयांवरून सुमारे १ लाख ४६ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. नंतर तडजोडीअंती १ लाख ४० हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याचे तपासात समोर आले.
लाचेची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सोमवारी सापळा रचला. त्यावेळी समीर म्हात्रे यांनी मुंबई APMC कार्यालयातील केबिनमध्ये १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दुपारी २.२४ वाजता त्यांना रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान डॉ. दिपक आवटे यांनीदेखील लाचेची मागणी केल्याचे आणि रक्कम समीर म्हात्रे यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.
दरम्यान, APMCमध्ये नालेसफाई आणि साफसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप अनेक वर्षांपासून होत आहेत. वर्षाकाठी १० ते १२ कोटी रुपये साफसफाई आणि नालेसफाईवर खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई कितपत होते, यावरच बाजार घटकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “१५ टक्के कमिशन दिल्यानंतर प्रत्यक्ष काम कसे करायचे?” असा सवाल काही ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नालेसफाई केवळ कागदावरच होत असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे.
विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावरही अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे अपूर्ण असल्याचे चित्र आहे. पावसाच्या काळातच निविदा प्रक्रिया काढली जाते आणि ठेकेदारांकडून टक्केवारी मिळाल्याशिवाय वर्क ऑर्डर दिली जात नसल्याची चर्चा बाजार समितीत रंगली आहे.
दरम्यान, APMCमधील आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय कामकाजावरही आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक कंत्राटदारांची कामे पूर्ण होऊन त्यांच्या देयकांचे चेक तयार असूनही ते अद्याप सभापती आणि सचिव यांच्या सह्यांशिवाय प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांना पैसे मिळत नसल्याची चर्चा आहे.
याशिवाय मालमत्ता विभागातील गाळे आणि कार्यालय ट्रान्सफरच्या अनेक फाईल्सदेखील सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे समोर येत आहे. आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण असूनही सभापती व सचिव सह्या का करत नाहीत, यावर बाजार वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एसीबीच्या कारवाईनंतर आता “टक्केवारी” मिळत नसल्यामुळेच कंत्राटदारांचे चेक रोखून ठेवण्यात आले होते का? तसेच गाळे व कार्यालयच्या फाईल्स आणि ट्रान्सफर प्रस्ताव जाणीवपूर्वक थांबवले जात होते का? याचाही तपास होण्याची मागणी बाजार घटक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे APMCमधील आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांचा संपूर्ण तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या कारवाईनंतर आता एसीबीचा तपास केवळ दोन अधिकाऱ्यांपुरता मर्यादित न राहता, या कमिशन रॅकेटमागील वरिष्ठ साखळीपर्यंत पोहोचणार का, याकडे संपूर्ण APMC वर्तुळाचे लक्ष लागले आहे.