मुंबई APMCमध्ये 19 मोठ्या ई-निविदा स्वच्छता, डिजिटायझेशन, FASTag प्रणाली ते इमारत दुरुस्तीपर्यंत विविध कामांसाठी कंत्राट प्रक्रिया सुरू
मुंबई APMCमध्ये 19 मोठ्या ई-निविदा स्वच्छता, डिजिटायझेशन, FASTag प्रणाली ते इमारत दुरुस्तीपर्यंत विविध कामांसाठी कंत्राट प्रक्रिया सुरू
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC Tender ) प्रशासनाने विविध विकासकामे, स्वच्छता व्यवस्था, तांत्रिक सुविधा आणि कार्यालयीन आवश्यकतांसाठी एकूण १९ ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या ई-निविदा २८ जुलै २०२६ पासून महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर्स पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या असून इच्छुक कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
यामध्ये सन २०२६-२७ व २०२७-२८ तसेच पुढील ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यालयीन लेखन साहित्य खरेदी तसेच कार्यालयीन मुद्रण स्टेशनरी साहित्य खरेदी करण्यासाठी स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या आहेत.
स्वच्छता व्यवस्थेला प्राधान्य देत विकास टप्पा-२ मधील मार्केट-१, मार्केट-२, भाजीपाला बाजार, फळ बाजार, कांदा-बटाटा बाजार, अतिरिक्त भाजीपाला बाजार, अतिरिक्त शॉप-कम-गोडाऊन, मार्केट-२ मध्यवर्ती इमारत, फळ बाजारातील मध्यवर्ती, ऑक्झिलरी व निर्यातदार इमारती तसेच प्रशासकीय इमारतीतील सर्व शाखा कार्यालये आणि सामाईक परिसराची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये कचरा डम्पिंग स्पॉटवर जमा करणे, प्रसाधनगृहांची जेट स्प्रे मशीनद्वारे सफाई तसेच मार्केट-२ लगतच्या युरीनल्सची साफसफाईचाही समावेश आहे.
याशिवाय विविध बाजार आवारातील डम्पिंग स्पॉटवर जमा होणारा कचरा दररोज कॉम्पॅक्टरद्वारे उचलून नवी मुंबई महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर वाहतूक करणे, फळ व भाजीपाला बाजारातील उघडी व भुयारी गटारे साफ करणे, तसेच पॉवर स्प्रे इंजिनद्वारे औषध फवारणी आणि फॉगिंग मशीनद्वारे धुरीकरण करण्यासाठीही स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
तांत्रिक आधुनिकीकरणाच्या दृष्टीने मुंबई APMCच्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्यासाठी डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम (DMS) उभारण्यासाठी Request for Proposal (RFP) मागविण्यात आला आहे.
याशिवाय धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुलातील दैनंदिन साफसफाईतून निर्माण होणारा हिरवा पालापाचोळा संकलित करून बाजार समितीस मोबदला अदा करत बाजाराबाहेर नेण्याची व्यवस्था करण्यासाठीही निविदा काढण्यात आली आहे.
वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध बाजार आवारात FASTag प्रणालीसाठी IP आधारित RFID आणि ANPR युक्त स्वयंचलित Boom Barrier प्रणालीचा पुरवठा व कार्यान्वयन करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तसेच फळ बाजारातील विविध ब्लॉकच्या मुख्य पॅसेजच्या छताचे मायक्रो काँक्रीटीकरण, आरसीसी कॉलम व बीमचे स्ट्रेंथनिंग करण्यासाठीही स्वतंत्र ई-निविदा जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई APMC प्रशासनाने या सर्व ई-निविदा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत MahaTenders पोर्टलवर प्रसिद्ध केल्या असून अधिक माहितीसाठी बाजार समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
* एकूण १९ ई-निविदा प्रसिद्ध
* कार्यालयीन साहित्य व मुद्रण साहित्य खरेदी
* सर्व प्रमुख बाजार आवारांची दैनंदिन साफसफाई
* कचरा संकलन व डम्पिंग ग्राऊंडपर्यंत वाहतूक
* गटार सफाई, औषध फवारणी व फॉगिंग
* कागदपत्रांचे डिजिटायझेशन (DMS)
* FASTag, RFID व ANPR आधारित प्रवेश व्यवस्था
* फळ बाजारातील इमारतींचे स्ट्रेंथनिंग व मायक्रो काँक्रीटीकरण
* धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुलातील हिरव्या कचऱ्याचे व्यवस्थापन