मुंबई APMCतील नालेसफाई ठेक्यांमधील 15 टक्के कमिशन प्रकरणात अटक आरोपींना २२ मेपर्यंत एसीबी कोठडी
मुंबई APMCचे घनकचरा व स्वच्छता उपसचिव डॉ. दिपक आवटे आणि प्रभारी स्वच्छता निरीक्षक समीर म्हात्रे यांना मंगळवारी १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले
नालेसफाई ठेक्यांत कोट्यवधींचा घोटाळा? वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तपासाची शक्यता
‘टक्केवारीशिवाय वर्क ऑर्डर नाही’ APMCतील कमिशनखोरीची धक्कादायक प्रकार उघड
पावसाळा तोंडावर, नालेसफाई अपूर्ण APMC प्रशासन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
मुंबई APMCमधील नालेसफाई आणि साफसफाईच्या कामांमध्ये सुरू असलेल्या कथित ‘15 टक्के कमिशन’ रॅकेटचा नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठा पर्दाफाश केला आहे. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उपसचिव डॉ. दिपक आवटे आणि प्रभारी स्वच्छता निरीक्षक समीर म्हात्रे यांना १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी मुंबई APMC मुख्यालयातून रंगेहाथ अटक करण्यात आली होती.
या दोघांना बुधवारी बेलापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २२ मेपर्यंत एसीबी कोठडी सुनावली. या कारवाईनंतर मुंबई APMCच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, नालेसफाई आणि साफसफाईच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी झाल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
तपासादरम्यान “ठेक्यांमधून घेतली जाणारी कमिशनची रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत होती,” अशी धक्कादायक चर्चा समोर येत असल्याने एसीबीचा तपास आता वरिष्ठ साखळीपर्यंत पोहोचणार का, याकडे संपूर्ण APMC प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, पावसाळा तोंडावर येऊनही बाजार समिती परिसरातील अनेक भागांत नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण असल्याची तक्रार व्यापारी आणि कामगारांकडून होत आहे. “टक्केवारी मिळाल्याशिवाय वर्क ऑर्डर दिली जात नव्हती,” अशीही चर्चा बाजार समितीत रंगू लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणात केवळ दोन अधिकाऱ्यांपुरती कारवाई न राहता, नालेसफाई आणि साफसफाईच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये नेमके कोणी ‘हात साफ’ केले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एसीबीच्या पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.