मुंबई APMCमध्ये मोफत कर्करोग पूर्वतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
तंबाखूमुक्ती जनजागृतीसह दोन दिवसांच्या आरोग्य मोहिमेला सुरुवात
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत तोंडाच्या कर्करोग पूर्वतपासणी शिबिराला बाजार घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मसाला व फळ मार्केटमध्ये सुरू झालेल्या या दोन दिवसीय आरोग्य शिबिरात व्यापारी, हमाल, माथाडी कामगार, वाहतूकदार, सुरक्षा कर्मचारी तसेच साफसफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
“तंबाखूला टाळू या… कर्करोगावर मात करू या… आरोग्य राखू या…!” या ब्रीदवाक्याखाली मुंबई APMC, टाटा मेमोरियल सेंटर आणि वर्ल्ड अग्रो केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी पणन संचालक व सचिव शरद जरे यांनी डॉक्टरांशी संवाद साधत या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जात असल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे वेळेत तपासणी करून आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेचे नेतृत्व डॉ. अजय पाटील करत असून, वर्ल्ड अग्रो केअर फाऊंडेशनचा देखील उपक्रमात सक्रिय सहभाग आहे. शिबिरामध्ये तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी, तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती तसेच तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.
APMC प्रशासनाने व्यापारी, कामगार आणि सर्व बाजार घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.