राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबईAPMC मध्ये रात्री झाडांची कत्तल! ४ दिवस आधी माहिती… तरी ८ झाडे तोडली!
कांदा-बटाटा मार्केटमध्ये शनिवारी रात्री झाडांची कत्तल चार दिवस आधीच सुरक्षा विभागाला माहिती, तरीही घटना घडली कशी?
 
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार मुंबई APMCच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये डिजिटल होर्डिंगच्या परिसरातील तब्बल आठ झाडे शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे झाडे तोडण्यासाठी काही व्यक्ती चार दिवस आधीच परिसरात आल्या होत्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना झाडे तोडण्यास मज्जाव करून वरिष्ठ सुरक्षा अधिकारी जगताप यांना माहिती दिली होती. त्यानंतर उद्यान विभागाकडूनही झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मग चार दिवसांनंतर रात्रीच्या वेळी नेमकी आठ झाडे तोडली कशी? या प्रकारामुळे APMCच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डिजिटल होर्डिंगच्या जाहिरातीसाठीच झाडे तोडण्याचे नियोजन?
बाजार घटकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिजिटल होर्डिंगजवळील झाडांमुळे होर्डिंगवरील जाहिराती दिसण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे जाहिरात स्पष्टपणे दिसावी यासाठी झाडे हटविण्याचे नियोजन करण्यात आले होते का, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
चार दिवस आधी झाडे तोडण्यासाठी आलेल्या व्यक्तींना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले होते. ही बाब वरिष्ठ सुरक्षा अधिकारी जगताप यांना कळविण्यात आली. त्यानंतर जगताप यांनी मुख्य सुरक्षा अधिकारी व उद्यान विभागाशी संपर्क साधला. उद्यान अधिकारी   यांनी “झाडे तोडण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही,” असे त्यांनी सांगितले होते मात्र, ही माहिती मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना असतानाही शनिवारी रात्री पुन्हा त्याच परिसरात जाऊन एक-दोन नव्हे तर तब्बल आठ झाडे तोडण्यात आली, त्यामुळे या संपूर्ण प्रकारामागे पूर्वनियोजन होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षा यंत्रणा नेमकी करते तरी काय?
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात असताना रात्रीच्या वेळी आठ झाडे तोडली जात असतील, तर प्रत्यक्ष नियंत्रण नेमके कुठे आहे? असा सवाल बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.
झाडे तोडण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ आणि वाहनांसह व्यक्ती परिसरात दाखल झाल्या असतील, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याची माहिती कशी मिळाली नाही? मिळाली असेल तर वरिष्ठांना पूर्वकल्पना देऊनही झाडे तोडण्याची घटना का रोखता आली नाही? घटनास्थळी त्या वेळी कोणत्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची ड्युटी होती? सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
‘परवानगी नाही’ माहिती असूनही झाडे तोडली कशी?
चार दिवस आधीच झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला आणि सुरक्षा विभागाने तो रोखला. त्यानंतर उद्यान विभागाकडूनही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. असे असताना पुन्हा रात्रीच्या वेळी त्याच ठिकाणी झाडे तोडली गेली असल्याने या घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
विशेषतः डिजिटल होर्डिंगचा फायदा होण्यासाठी झाडे हटविण्याचे काही नियोजन करण्यात आले होते का, एका   उपअभियंत्याचे सहकारी घटनास्थळी कोणत्या कारणासाठी होते, तसेच सुरक्षा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती असतानाही प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही, याची चौकशी करण्याची मागणी बाजार घटकांकडून होत आहे.
झाडे लावण्याऐवजी झाडांची कत्तल?
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्याची गरज असताना झाडे लावण्याऐवजी विद्यमान झाडेच तोडली जात असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. डिजिटल जाहिराती दिसाव्यात म्हणून झाडे तोडण्याचा प्रकार झाला आहे का, हे चौकशीत स्पष्ट होणे गरजेचे आहे.
या प्रकरणात झाडे तोडण्याची परवानगी कोणी दिली? प्रत्यक्ष झाडे कोणी तोडली? सुरक्षा विभागाला माहिती कधी मिळाली? चार दिवस आधीची माहिती असूनही प्रतिबंधात्मक कारवाई का झाली नाही? घटनास्थळी कोण अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित होते? तसेच डिजिटल होर्डिंगच्या जाहिरातीचा फायदा मिळण्यासाठी कोणतेही नियोजन झाले होते का, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून भविष्यात APMCच्या आवारात अशा प्रकारे झाडे तोडण्याची हिंमत कोणालाही होणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने द्यावा, अशी मागणी बाजार घटकांकडून होत आहे.
राष्ट्रीय बाजारात मोठी सुरक्षा यंत्रणा असूनही आठ झाडे रात्रीतून तोडली जातात मग सुरक्षा व्यवस्थेचे नियंत्रण नेमके कुठे आहे? हा प्रश्न मात्र या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे.