NMMC आयुक्त कैलास शिंदेंच्या पाहणी दौऱ्यात APMC स्वच्छता विभागाची पोलखोल
10 कोटींची साफसफाई… पण प्रत्येक्ष्यात एकही कर्मचारी दिसले नाही!
आयुक्तांच्या दौऱ्यात एपीएमसी स्वच्छता विभागाचा भोंगळ कारभार उघड
कागदावर कर्मचारी, मार्केटमध्ये घाण! — एपीएमसी प्रशासनावर सवाल
पावसाळ्यापूर्वीच एपीएमसीची पोलखोल साफसफाईवर कोट्यवधींचा खर्च वाया?
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुंबई एपीएमसी मार्केटमधील स्वच्छता व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी नाले व स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ   कैलास शिंदे यांनी ६ मे रोजी एपीएमसी परिसराचा दौरा केला. मात्र या पाहणीदरम्यान संपूर्ण मार्केटमध्ये घाण, कचरा आणि अस्वच्छ वातावरण दिसून आले, तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकही कंत्राटी स्वच्छता कर्मचारी काम करताना आढळला नाही.
एपीएमसी प्रशासनाकडून दरवर्षी स्वच्छता आणि साफसफाईसाठी तब्बल १० ते १२ कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा केला जातो. बाजार समितीअंतर्गत पाचही मार्केटमध्ये जवळपास ३५० कंत्राटी स्वच्छता कामगार कार्यरत असल्याचे सांगितले जाते. फळ आणि भाजी मार्केटमध्येच ७० ते ७५ कर्मचारी नियुक्त असल्याची माहिती आहे. मात्र आयुक्तांच्या प्रत्यक्ष पाहणीवेळी एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने “काम नेमकं होतंय कुठे?” असा सवाल व्यापारी आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडतात. नालेसफाई आणि स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाहणी दौऱ्यात अधिकारी उपस्थित होते, मात्र प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी गायब असल्याने स्वच्छता विभागाचा कारभार केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यानंतर आता पणन संचालक व सचिव शरद जरे घनकचरा व स्वच्छता विभागावर काय कारवाई करणार , याकडे बाजार घटकांचे   लक्ष लागले आहे.