कामगारांचे तारणहार अण्णासाहेब पाटील यांना भावपूर्ण अभिवादन; माथाडी भवनात 44 वी पुण्यतिथी साजरी
- माथाडी कामगार व नेत्यांची उपस्थिती संघर्षमय कार्याचा स्मरणोत्सव
नवी मुंबई : मराठा आरक्षण चळवळीचे जनक आणि माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 44 वी पुण्यतिथी वाशी येथील माथाडी भवनमध्ये अभिवादन सभेने साजरी करण्यात आली.
यावेळी माथाडी कामगार, विविध संघटनांचे नेते तसेच राजकीय प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णासाहेब पाटील यांना त्रिवार वंदन केले. माथाडी भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात त्यांच्या माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षमय कार्याचा तसेच मराठा समाजासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. या प्रसंगी माथाडी कामगार संघटनांचे नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, चंद्रकांत पाटील, रवी पाटील, पोपटराव देशमुख यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील यांचे कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगत उपस्थितांनी त्यांना ‘कामगारांचे तारणहार’ म्हणून गौरविले. आपल्या आयुष्याचे बलिदान देऊन त्यांनी माथाडी कामगारांना हक्काचे आणि सन्मानाचे जीवन मिळवून दिले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.