मराठा तरुणांसाठी उद्योग कर्जाचा मार्ग होणार आणखी सोपा; अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांमध्ये पतसंस्थांचाही समावेश करण्याची तयारी
-मंत्रालयात सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
मुंबई | मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांमध्ये बँकांसोबतच सक्षम पतसंस्थांचाही समावेश करण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यासंदर्भात सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत डॉ. भोयर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात पतसंस्थांचे मजबूत जाळे असल्यामुळे कर्जवाटप प्रक्रिया अधिक जलद आणि लाभार्थी-केंद्रित होऊ शकते. त्यामुळे पात्र पतसंस्थांचा योजनांमध्ये समावेश झाल्यास मराठा समाजातील अधिकाधिक युवकांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होईल. यामुळे ग्रामीण भागात उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल.
सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत उद्योग कर्जाचे वितरण आणि व्याज परतावा बँकांमार्फत केला जातो. हेच काम सक्षम पतसंस्थांमार्फतही प्रभावीपणे करता येईल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. यासाठी पतसंस्थांची निवड करताना आर्थिक क्षमता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचे ठराविक निकष निश्चित करण्याचे निर्देशही राज्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, दक्षिण कराडचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार आयुक्त व निबंधक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.