10 मिनिटांत डिलिव्हरी… पण गोदामात झुरळांचा सुळसुळाट!
Blinkitच्या मालाडमधील गोदामावर FDAची धाड गंभीर अनियमितता आढळल्यानंतर परवाना निलंबित
मुंबई : 10 मिनिटांत ग्राहकांच्या घरपोच वस्तू पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या Blinkitच्या मालाड येथील गोदामात मात्र अन्न सुरक्षेचे धिंडवडे उडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDAने   अचानक केलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्यानंतर गोदामाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.
FDAच्या तपासणीत फळे आणि भाज्यांच्या साठवणूक परिसरात मोठ्या प्रमाणात झुरळांचा वावर आढळला. कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठी प्रभावी Pest Control व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले.
इतकंच नाही, तर गोदामात काही अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे, कोल्ड स्टोरेजची नियमित स्वच्छता होत नसल्याचे आणि मुदतबाह्य तसेच खराब झालेले पॅकबंद अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे FDAच्या तपासणीत समोर आले.
अन्नपदार्थांच्या साठवणुकीत FIFO आणि FEFO या आवश्यक पद्धतींचे पालन होत नसल्याचेही आढळले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि त्याच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे FDAने नमूद केले आहे.
FDAचा थेट इशारा
गंभीर नियमभंगाची दखल घेत FDAने अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कारवाई करत गोदामाचा परवाना निलंबित केला आहे.
परवाना निलंबित असताना या ठिकाणाहून अन्नपदार्थांची विक्री, पुरवठा किंवा वितरण सुरू ठेवल्यास व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर आणि गुन्हेगारी कारवाई केली जाईल, असा इशाराही FDAने दिला आहे.
10 मिनिटांत डिलिव्हरीचा दावा करणाऱ्या Blinkitच्या गोदामात अन्न सुरक्षेचे हे चित्र समोर आल्यानंतर ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.
मोठे सवाल
* ग्राहकांना सुरक्षित अन्न देण्याची जबाबदारी असताना गोदामात एवढी अस्वच्छता कशी?
* झुरळांचा वावर आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांकडे व्यवस्थापनाचे लक्ष का गेले नाही?
* कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक नोंदी का नव्हत्या?
* 10 मिनिटांच्या डिलिव्हरीच्या स्पीडपेक्षा अन्न सुरक्षेला प्राधान्य दिलं जातंय का?