खाद्यतेल पुन्हा महागलं! मोहरी तेल 220 रुपयांवर; पाम, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या दरातही मोठी वाढ
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून मोहरीच्या तेलाचा किरकोळ दर थेट 220 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या विविध प्रकारांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर, जौनपूरसह आसपासच्या भागात मोहरीचे तेल घाऊक बाजारात 7,000 ते 7,500 रुपये क्विंटल दराने विकले जात आहे. आगामी काळात हा दर 8,000 रुपये क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका महिन्यात मोहरीच्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
वर्षभरात खाद्यतेल किती महागलं?
केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाच्या आकडेवारीनुसार, 15 ऑगस्ट 2025 रोजी मोहरीचे तेल सरासरी 118.20 रुपये किलो होते. आता त्याचा सरासरी दर 197.25 रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारात मात्र काही ठिकाणी तो 220 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पाम तेलाचाही दर वाढला आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला पाम तेल 130.24 रुपये किलो होते, तर आता ते 149.57 रुपये किलो झाले आहे. म्हणजेच जवळपास 20 रुपयांची म्हणजे सुमारे 14 टक्के वाढ झाली आहे.
सूर्यफूल तेलाच्या दरातही तब्बल 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 159 रुपये किलो असलेले सूर्यफूल तेल आता 191.16 रुपये किलो झाले आहे. तर शेंगदाणा तेलाचा दर 185.26 रुपयांवरून 205.39 रुपये किलो झाला असून, त्यात सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
पावसाचा फटका, पुरवठ्यावर परिणाम
यंदाच्या हंगामात अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमती वाढण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. पावसामुळे काही भागांमध्ये पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे घरगुती बजेटवरही अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे डाळी, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आता खाद्यतेलानेही महागाईचा तडाखा दिल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता आहे.