दिवाळीच्या मिठाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर FDAचा छापा! १७.८२ टन साठा जप्त; ६३ लाखांचा माल ताब्यात
मिठाई -फराळाच्या कच्च्या मालाची तपासणी ठाणे, नवी मुंबई, वसई, भिवंडीत FDAची धडक मोहीम
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: दिवाळीच्या सणात मिठाई आणि फराळाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत खवा, मावा, काजू, बदाम, पामोलीन तेल आणि मिठाईसह तब्बल १७ हजार ८२४ किलो (१७.८२ टन) खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत ६३ लाख ९ हजार २८५ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईत मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, भिवंडी आणि वसई परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा ताब्यात घेण्यात आला.
पालघरमध्ये महामार्गावर दोन वाहनांवर कारवाई
पालघर जिल्ह्यात महामार्गावरून वाहतूक होत असलेल्या दोन वाहनांमधून तब्बल ३ हजार ९३५ किलो खवा आणि मिठाई पकडण्यात आली. सणासुदीच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीवरही FDAने लक्ष केंद्रित केले आहे.
कोकण विभागात सर्वाधिक साठा जप्त
या विशेष मोहिमेत कोकण विभागाने सर्वाधिक कारवाई केली. कोकण विभागातून १३ हजार ९७०.९ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ५४ लाख ५२ हजार २७५ रुपये आहे.
वसई परिसरातून ४ हजार १९३ किलो मावा, खवा आणि मिठाई जप्त करण्यात आली. या मालाची किंमत ८ लाख ९२ हजार ४५० रुपये आहे. वसईतील अन्य एका ठिकाणाहून ४०७ किलो खवा-मावा, तर कामण परिसरातून १ हजार ३६ किलो फराळाचे पदार्थ जप्त करण्यात आले.
डोंबिवली पूर्वेतून १ हजार ५७०.४ किलो फरसाण, लसूण चिवडा आणि पामोलीन तेलाचा साठा ताब्यात घेण्यात आला. तर भिवंडी येथून १ हजार ३०० किलो काजू कतलीचा साठा जप्त करण्यात आला.
राज्यभरात ४३ अन्न परवाने निलंबित
या मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. राज्यभरात एकूण ४३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाचा किंवा नियमांचे उल्लंघन करून साठवलेला कच्चा माल नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे FDAच्या या कारवाईकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.